परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून साधिकेच्या पूर्ण कुटुंबावर केलेली कृपा !
१. लहानपणापासून अध्यात्माची आवड नसणे
‘माझे लग्न वयाच्या १९ व्या वर्षी झाले. लग्नाच्या आधी मला पूजा करण्याचा कंटाळा यायचा आणि देवळात जायलाही आवडत नव्हते. मला कोणतीही नवीन कृती शिकण्याची पुष्कळ आवड होती; परंतु शिक्षण चालू असतांना लग्न झाले, त्यामुळे शिक्षण बंद झाले. नंतर सासरी गेल्यावर त्यांच्या अनुमतीने शिलाई, कापड कापणे (कटिंग) आणि रंगवणे (पेंटिंग) शिकले अन् शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) घेतले.
२. यजमान व्यसनाधीन असल्यामुळे दुकानात बसावे लागणे
आमचे दुकान होते. यजमान व्यसनाधीन असल्यामुळे ते दुकानात क्वचित् बसायचे. त्यामुळे बरीच वर्षे मीच दुकानात बसत होते. यजमानांचे दुकानाकडे लक्ष नसल्याने मुलगाही दुकानात बसायचा. त्यामुळे त्याचेही शिक्षण झाले नाही. यजमानांची घरी येण्याची वेळ ठरलेली नव्हती.
३. साधनेत येण्यापूर्वी तणावाखाली रहाणे आणि प्रकृती नेहमी बिघडलेली असणे
एकदा आमच्या घरी गुरुपौर्णिमेच्या निमंत्रणासाठी काही साधक आले होते. त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हापासून माझ्या साधनेला प्रारंभ झाला. साधनेत येण्यापूर्वी मी नेहमी तणावाखाली रहात होते. मला नेहमी पोट, मान किंवा गुडघे यांचा त्रास होत असे. त्यामुळे माझी प्रकृती नेहमी बिघडलेली असायची. मला नेहमी दृष्ट लागायची.
४. साधना करू लागल्यावर यजमानांच्या त्रासांमध्ये वाढ होणे आणि नामजपादी उपाय केल्यावर ते त्रास दूर होणे
गुरुपौर्णिमेनंतर मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि माझा साधनाप्रवास चालू झाला. माझा कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप चालू झाले. त्या वेळी माझ्या त्रासांमध्ये वाढ झाली, म्हणजे जे यजमान मला कधी दुखावत नव्हते, ते मला पुष्कळ मारहाण आणि शिवीगाळ करू लागले. मला मारायची धमकी द्यायचे. रात्र झाली की, मला भीती वाटायची आणि मी त्यांच्या बाजूला चार-चार घंटे बसून रहायची. ते काही वाईट बोलायला लागले की, मी त्यांच्याशी वाद घालत होते. त्यामुळे ते अजून उग्र होत होते; म्हणून याविषयी मी उन्नत साधकांना विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रात्री प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायचे आणि नामजप करू लागले. त्यामुळे यजमान काही न बोलता शांत रहायचे. आता त्यांना होणारा त्रास अल्प झाला आहे.
५. यजमानांना दुचाकी घेण्यास नकार दिल्यावर घरात भांडणे होणे
एकदा त्यांनी मला ‘‘दुचाकी घ्यायची का ?’’, असे विचारल्यावर मी त्यांना ‘‘नको’’ म्हटले. तेव्हापासून ते एक मास त्यावरून घरात भांडत होते. शेवटी मी त्यांना ‘‘घ्या’’, असे म्हणाले. आज त्यांनी ती दुचाकी मला सेवेसाठी दिली आहे.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणल्यामुळे पूर्ण कुटुंबात पालट होणे
आता माझे यजमान नामजप करतात. ते नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात. त्यांच्यात पुष्कळ पालट झाला आहे. माझाही त्रास अल्प झाला आहे. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाले आहे. त्यांनी मला साधनेत आणले नसते, तर मी अंथरुणावर आजारी म्हणून पडून राहिले असते. यजमानांनी त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट केले असते. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने आज मुलेही चांगली आहेत.
७. दुचाकीवरून जातांना तोल गेल्यावर परात्पर गुरुमाऊलीने वाचवल्याची अनुभूती येणे
एकदा मी दुचाकीवरून जातांना माझा तोल गेला आणि गाडीचा पूर्ण भार माझ्या पायाच्या दोन बोटांवर आला. त्यामुळे ‘माझा पाय आणि बोटे गेली’, असे मला वाटत होते. त्याच वेळी समोरून एक व्यक्ती आली आणि तिने गाडीचे ‘हॅण्डल’ पकडून गाडी उभी केली. मी सरळ झाल्यावर त्या व्यक्तीला बघितले, तर तेथे कोणीच नव्हते. तेव्हा ती ‘परात्पर गुरुमाऊलीच असेल’, असे मला वाटले; कारण माझ्यासमवेत सदैव गुरुमाऊली असते. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त झाली.’
– एक साधिका (७.३.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |