‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या अस्तित्वानेच कार्य होते’, याची साधकाला आलेली प्रचीती !
१. ‘कुटुंबियांनी साधना करण्यासाठी मी कोणते प्रयत्न करू ?’, असा विचार मनात येणे, त्या वेळी कुटुंबियांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ देऊन त्यांना त्यातील छायाचित्र रूपातील परात्पर गुरुदेवांशी बोलण्यास सांगणे
‘सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माझ्या कुटुंबियांना काहीच ठाऊक नाही. त्यामुळे ‘माझे आई-बाबा आणि बहीण यांना साधना सांगून काहीही परिणाम होणार नाही. कुटुंबियांनी साधना करण्यासाठी मी काय प्रयत्न करायला हवेत ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले आहे, ‘कुटुंबियांनी साधना करावी’, अशी अपेक्षा साधकांनी करू नये. त्यांना साधना सांगण्याचा प्रयत्न करावा. बाकी देवावर सोडावे.’ त्याप्रमाणे मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘परात्पर गुरुदेव, मी क्रियमाण कर्म केले आहे. मी आई-बाबांना सनातनचा आश्रम दाखवला; पण आता माझे प्रयत्न संपलेेे आहेत. आपणच त्यांना साधना शिकवावी.’ त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा केवळ ग्रंथ नसून प्रत्यक्ष गुरुदेवच आहेत’, असा विचार करून मी हा ग्रंथ कुटुंबियांना देण्याचे ठरवले. मी प्रार्थना करून माझ्या आई-बाबांना हा ग्रंथ दिला आणि म्हटले, ‘‘तुम्हाला कोणताही प्रश्न असेल किंवा काहीही विचारायचे असेल, तर या ग्रंथामधील छायाचित्रातील गुरुदेवांना प्रार्थना करून त्यांच्याशी बोला आणि ग्रंथातील प्रत्येक पान नीट वाचा.’’
२. आईने ग्रंथ वाचल्यावर तिला परात्पर गुरुदेवांची महानता लक्षात येणे आणि तिने आश्रमात येऊन पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा दर्शवणे
मला वाटले, ‘परात्पर गुरुदेव माझ्या कुटुंबियांच्या मनात हळूहळू साधनेची आवड निर्माण करतील’; पण आठ दिवसांतच ईश्वराने मोठी लीला केली. मला आईचा दूरभाष आला. त्या वेळी ‘मी जे ऐकत आहे, ते खरेच आहे का ?’, यावर माझा विश्वास बसत नव्हता. आई मला म्हणाली, ‘‘जयंत महाराज (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) किती हसून बोलतात ! दिवसातून ४ – ५ वेळा मी त्यांच्याजवळ जाते (‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहाते.), तेव्हा माझा जप किती चांगला होतो ! त्यांनी किती कष्ट घेतले आहेत? ते दोरीवर चालले, उंच शिडीवर चढले, विदेशात गेले आणि तेथेही किती फिरले ? ते किती संतांना भेटले आहेत ? त्यांनी किती गुरुसेवा केली आहे; म्हणून ते एवढे मोठे झाले आहेत.’’ माझी आईच मला ग्रंथातील माहिती समजावून सांगत होती. त्यानंतरही तिने मला २- ३ वेळा दूरभाष करून विचारले, ‘‘मी पूर्णवेळ सेवा करण्यासाठी आश्रमात येते. ‘मी येऊ शकते का ?’, हे तू आश्रमात विचारून घे.’’ ‘मी त्याविषयी विचारले का ?’, याचाही तिने पाठपुरावा घेतला.
३. बहिणीला ग्रंथ देतांना ‘हा ग्रंथ म्हणजे पुष्कळ मोठे धन असून तो पाचवा वेद आहे; म्हणून तो सांभाळून ठेव’, असे सांगणे आणि त्यानंतर तिने तो ग्रंथ देवघरात ठेवणे
मी माझ्या धाकट्या बहिणीला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ थोडा भीत-भीतच दिला; कारण ज्या दिवशी मी तिला हा ग्रंथ दिला, त्याच्या आदल्या दिवशीच तिने एका महाराजांकडून दीक्षा घेतली आणि त्यांनी लिहिलेले ५० – ६० ग्रंथ घेतले. मी माझ्या बहिणीला हा ग्रंथ देऊन म्हणालो, ‘‘हा ग्रंथ सांभाळून ठेव. मुलांच्या हाती लागून खराब होणार नाही, असा ठेव. हा ग्रंथ म्हणजे माझा प्राण आहे. मी तुला धन देऊ शकत नाही; पण हेच पुष्कळ मोठे धन आहे. ‘हा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद आहे’, हे लक्षात घेऊन तो सांभाळ.’’ त्यावर बहिणीने होकार देऊन तो ग्रंथ कपाटात ठेवला. ते पाहून माझ्या मनात विचार आला, ‘आता हा ग्रंथ ही कधी वाचेल का ? मी हा ग्रंथ तिच्याकडून परत घेऊ का ?’ पुन्हा विचार केला, ‘आता मी तिला ग्रंथ दिला आहे, तर कोणताही विचार करायला नको. गुरुदेव योग्य ते करतील.’
त्यानंतर आठ दिवसांतच माझ्या बहिणीचा मला दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मी तो ग्रंथ देवघरात ठेवला आहे. मला त्या ग्रंथाकडे सारखे पहावेसे वाटते. हा ग्रंथ पुष्कळच छान आहे.’’
४. बहिणीला आलेली अनुभूती – खोकल्यामुळे मुलाला रात्री त्रास होत असतांना बहिणीने परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि त्यानंतर मुलाला रात्रभर शांत झोप लागणे
ती पुढे म्हणाली, ‘‘माझी मुले कु. भक्ती (वय ५ वर्षे) आणि चि. भार्गव (वय ३ वर्षे) हेसुद्धा एकसारखे त्या ग्रंथाकडे पाहून मला विचारतात, ‘‘हे कोण आहेत ?’’ ते दोघे १ – २ दिवस ग्रंथ केवळ पहातच होते. आता ग्रंथ घेऊन आतील चित्रे पहातात. एकदा भार्गवला खोकला झाला होता. त्यामुळे तो रात्री रडत होता. तेव्हा मी आठवले गुरूंना प्रार्थना केली, ‘तुम्हीच काय असेल, ते बघा.’ त्यानंतर तो झोपला. सकाळपर्यंत त्याला काहीच त्रास झाला नाही.
सकाळी कामानिमित्ताने घरातून बाहेर जातांना मी परात्पर गुरुदेवांना सगळे सांगून घराबाहेर पडते आणि गाडीत बसल्यानंतरही मी त्यांना सांगते. दादा, तू मला २ – ३ दिवसांतून संपर्क कर.’’
५. माझे भाऊजीसुद्धा घरातून बाहेर पडतांना ग्रंथाला नमस्कार करतात.
६. बहिणीचे कुटुंबीय अन्य संप्रदायानुसार साधना करत असूनही त्यांनी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे ‘देव’ या भावाने पहाणे
माझ्या बहिणीचे कुटुंबीय अन्य संप्रदायानुसार साधना करत असूनही त्यांनी हा ग्रंथ देवघरात ठेवला. ते सर्व जण परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे ‘देव’ या भावाने पहातात. हे सर्व ऐकल्यावर मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘माझी बहीण आणि तिची लहान मुले त्यांच्या गुरूंचे ग्रंथ सोडून परात्पर गुरुदेवांच्या ग्रंथांकडे कशी आकर्षित झाली ? बहिणीने तो ग्रंथ देवघरात कसा काय ठेवला ?’, असे विचार माझ्या मनात आले. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या अस्तित्वानेच कार्य होत आहे’, असे मला जाणवले.
परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेव, मला परत परत म्हणावेसे वाटते, ‘गुरुदेव, आपण धन्य आहात, धन्य आपला ग्रंथ आणि धन्य ईश्वरी लीला !’
– श्री. कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |