प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड
|
अकोला – पशूसंवर्धन विकास मंडळ कार्यालय नागपूर येथे हालवण्यात येत आहे; मात्र याला विरोध करून येथील प्रहार संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना ७ फेब्रुवारी या दिवशी घडली. राज्य सरकार येथील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते ?, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे. कार्यालय स्थलांतरास भाजपने विरोध करून या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले. नगरसेवक गिरीश जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वर्ष २००६ मध्ये येथे राज्यातील पशूसंवर्धन विकास मंडळ स्थापन झाले होते. त्यानंतर येथूनच राज्याचा या विभागाचा कारभार चालू होता; मात्र हे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न चालू झाले होते; मात्र त्याला येथील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर शासनाने याविषयी सावध भूमिका घेतली होती, तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही हे कार्यालय दुसरीकडे जाणार नाही, असे म्हटले होते. हे कार्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्याचे आदेश फेब्रुवारी मासाच्या पहिल्या आठवड्यात शासनाने काढले. त्यानुसार कार्यालयातील साहित्य हालवण्यात येत असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ज्या ट्रकमध्ये साहित्य ठेवण्यात येत होते, तो ट्रक आणि साहित्य यांची तोडफोड केली.