पुणे येथील एका साधिकेच्या एका डोळ्याची दृष्टी अल्प असतांना तिला संभाव्य अपघात टळण्यासंदर्भात आलेली अनुभूती
पुणे येथील सौ. राजश्री खोल्लम यांना एका डोळ्याची दृष्टी अल्प असल्याने एकाच वेळी सर्वत्र पाहून अंदाज घेणे अशक्य असणे, रस्ता ओलांडतांना त्यांचा संभाव्य अपघात टळणे आणि त्या वेळी त्यांना ‘सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच वाचवले’, असे जाणवणे
‘वर्ष २०१७ मध्ये एकदा मी पुण्यातील सातारा रस्ता येथे रस्ता ओलांडत होते. मला पलीकडे जाऊन पुढे बसने जायचे होते. मी अर्धा रस्ता ओलांडला. मध्ये ‘बीआरटी’ म्हणजे बसचा रस्ता होता. मी उजव्या बाजूने बस येत नसल्याची निश्चिती करून ‘बीआरटी’चा अर्धा रस्ता पार केला. आता पुढे जाण्यासाठी मी ‘डावीकडून बस येत आहे का ?’, हे पाहिले. तेथून दूरवर मला एकही बस दिसली नाही. त्यामुळे ‘आपण आता रस्ता ओलांडूया’, असा विचार करून मी पुढे जाणार होते; पण तेवढ्यात माझे पाय भूमीला खिळल्याप्रमाणे मी तिथेच उभी राहिले. तेव्हा ‘असे का झाले’, हे माझ्या लक्षात आले नाही. दुसर्याच क्षणी समोरच्या रस्त्यावरून धनकवडीतून येणारी बस ‘बीआरटी’ मार्गावर आली आणि ती माझ्या समोरून १ फुटाच्या अंतरावरून गेली. त्यापूर्वी ‘समोरच्या रस्त्यावरून बस येऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले नव्हते. (मला उपनेत्र (चष्मा) आहे आणि माझ्या एका डोळ्याची दृष्टी अल्प आहे. त्यामुळे एका वेळी सर्वत्र पाहून अंदाज घेणे मला शक्य होत नाही.) सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् ईश्वर असल्याने ते सर्वज्ञ आहेत. त्यामुळे ‘समोरून येणारी बस मी पाहिलेली नाही’, हे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनीच मला पुढे पाऊल टाकू दिले नाही आणि त्यांनीच संभाव्य अपघात टाळून माझे प्राण वाचवले. आजही हा प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो आणि माझे मन त्यांच्या या असीम कृपेसाठी कृतज्ञतेने भरून येते. मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. राजश्री खोल्लम, पुणे
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |