‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा करतांना सौ. मधुरा कर्वे यांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ऑक्टोबर २०१७ मध्ये मला सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनपर लेख लिहिण्यास शिकण्याची संधी मिळाली. मला सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांकडून आध्यात्मिक संशोधनांवर लेख लिहिण्याच्या संदर्भातील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे. त्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने संशोधनाच्या लेखांचे संकलन करण्याची संधी मिळाली. माझ्यातील दोषांमुळे संकलन सेवा शिकून घेण्याची माझ्या मनाची सिद्धता होत नव्हती. त्या वेळी सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी मला साधनेचे दृष्टीकोन देऊन ही सेवा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे संकलन सेवा शिकून घेण्याची माझ्या मनाची सिद्धता झाली. अत्यंत दयाळू आणि कृपाळू अशा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला पदोपदी सांभाळून घेतले. त्यामुळे मला सेवेचा ताण न येता तिच्यातून शिकण्याचा आनंद अनुभवता आला. या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या कोमल चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१. आरंभी मराठी भाषेत संशोधनविषयक लेख लिहिणे आणि त्या लेखांचे संकलन करणे, या सेवांचा ताण येणे
१ अ. मनात नकारात्मक विचार येणे : आरंभी मला पुढील विचारांमुळे सेवेसंदर्भात पुष्कळ ताण यायचा. ‘मला मराठी व्याकरण येत नाही. त्यामुळे शब्दांच्या चुका माझ्या कशा लक्षात येणार ? माझ्याकडून अनेक चुका होतील. मला ही सेवा जमणार नाही’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येत होते.
१ आ. मराठी भाषेतून ‘संशोधनविषयक लेख लिहिणे’ आणि ‘त्यांचे संकलन करणे’ या सेवांविषयी ताण येण्यामागील बुद्धीच्या स्तरावरील अडथळा : माझे वडील वायूसेनेत असल्याने आमचे वास्तव्य अधिकतर महाराष्ट्राबाहेर (अमृतसर, चंडीगड, कोलकाता इत्यादी ठिकाणी) असायचे. त्यामुळे शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमात ‘मराठी’ हा विषय नव्हता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर आम्ही पुणे येथे स्थायिक झालो. महाविद्यालयीन आणि संगणक क्षेत्रातील शिक्षण घेतांना माझे अधिकतर इंग्रजी भाषेमध्येच बोलणे व्हायचे. घरात आई-वडील मराठीत बोलायचे; त्यामुळे मराठीची थोडीफार ओळख होती. पुढे संगणक क्षेत्रातील चाकरीमुळे इंग्रजीतच बोलणे व्हायचे. यामुळे बुद्धीने विचार केल्यावर ‘मराठी भाषेत लेख लिहिणे, तसेच लेखांचे संकलन करणे’, हे मला अशक्य वाटत होते.
२. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मराठी भाषेचे महत्त्व लक्षात येऊन मराठीतून बोलण्याचा सराव होणे
वर्ष २००६ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन साधनेस आरंभ केला. मला वाचनाची आवड असल्याने मी मराठी साप्ताहिक, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ यांचे वाचन केले; परंतु त्यांतील पुष्कळ शब्द प्रथमच वाचनात आल्याने मला त्यांचा अर्थ नीटसा समजत नसे. ‘सनातन प्रभात’चे इंग्रजी मासिक वाचल्यावर मला विषयाचे आकलन होत असे. पुढे मी सेवेनिमित्त सनातनच्या साधकांच्या संपर्कात आल्यावर मला मराठीत बोलण्याचा हळूहळू सराव झाला. तेव्हा इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द विचारून घेऊन त्यांचा उपयोग करून मी बोलणे चालू केले. कालांतराने मला सनातनच्या ग्रंथांची भाषाही थोडीफार समजू लागली. गत ५ वर्षांपासून मी रामनाथी आश्रमात येऊन सेवा करत आहे. आश्रमात आल्यावर मला शुद्ध मराठीत बोलण्याचा सराव झाला. संशोधनाच्या प्रयोगांतूनही मराठीमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने असल्याचे मला समजले. त्यामुळे आता मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते. त्यातून चांगली स्पंदने येतात.
आता मला इंग्रजीतून संभाषण करणे नकोसे वाटते. ‘त्यातून पुष्कळ त्रासदायक स्पंदने येतात आणि त्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण येते’, असे मला जाणवते. शाळेत असतांना मला इंग्रजी मनापासून आवडत नसे. त्यामागील कारण आता माझ्या लक्षात आले.
३. संतांनी संकलनाच्या सेवेच्या संदर्भात आश्वस्त करणे
एकदा एका संतांची भेट झाली. त्या वेळी मी त्यांना मराठी लेखांच्या संकलनाविषयी माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘अभ्यासासाठी दिलेल्या धारिकांचा अभ्यास करता ना ? त्यातूनच शिकायचे. काळजी करायला नको.’’ तेव्हा माझ्या मनावरील ताण अल्प झाला. ‘त्यांनी माझ्यासाठी जणू संकल्पच केला आहे’, असे मला जाणवले. ‘संकलनाची सेवा गुरुदेवांनी दिली आहे, तर तेच करूनही घेणार आहेत’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला.
४. ‘संशोधनपर लेख लिहिणे आणि त्यांचे संकलन करणे’ या सेवा करतांना ठेवलेला भाव
संशोधनविषयक लेख लिहिण्याची सेवा करतांना देवाने मला पुढीलप्रमाणे भावप्रयोग सुचवला – ‘मी सेवा करतांना शेजारी सूक्ष्मातून एक मोकळी आसंदी ठेवली आहे. मी सेवा चालू करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांना भावपूर्ण प्रार्थना करत आहे. परात्पर गुरु डॉक्टर त्या आसंदीत येऊन बसले आहेत. ते मला संशोधनाच्या लेखातील सूत्रे सांगत आहेत आणि मी ती टंकलिखित करत आहे. ही सूत्रे टंकलिखित करून झाल्यावर मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.’
संशोधनपर लेखांचे संकलन करतांना ठेवत असलेला भाव – ‘मी सेवा चालू करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांना भावपूर्ण प्रार्थना करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्म रूप माझ्या हृदयात आहे. मी त्यांच्या अनुसंधानात राहून संकलनाची सेवा शिकत आहे. लेखाचे संकलन योग्य दिशेने होत आहे. त्यामुळे माझ्या मनाला आनंदाची स्पंदने जाणवत आहेत. सेवा पूर्ण झाल्यावर मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.’
५. स्पंदनांतून शब्दांच्या चुका ध्यानात येणे
५ अ. टंकलेखन करतांना शब्दाची चूक झाल्यास मनाला त्रासदायक स्पंदने जाणवणे आणि चूक सुधारल्यावर मनाला चांगली स्पंदने जाणवणे : टंकलेखन करतांना जेव्हा माझ्याकडून शब्दाची चूक होत असे. तेव्हा माझ्या मनाला त्रासदायक स्पंदने जाणवून माझी बोटे अडखळत किंवा संगणकाच्या पटलावरील चुकलेल्या शब्दावर माझी दृष्टी अडखळत असे. तेथे योग्य शब्दाचे टंकलेखन केल्यावर माझ्या मनाला चांगली स्पंदने जाणवून आनंद मिळत असे. त्यामुळे मनाला जाणवणार्या स्पंदनांवरून मला शब्दांच्या चुका लक्षात येत. टंकलेखन पूर्ण झाल्यानंतर मी मराठी शब्दकोशात पाहून शब्द योग्यरित्या लिहिल्याची निश्चिती करून घेते. त्यामुळे ‘शब्दांच्या चुका माझ्या लक्षात कशा येणार ?’, अशी मला चिंता उरली नाही.
५ आ. मनाला जाणवणार्या चांगल्या स्पंदनांतून संकलनाची सेवा योग्य दिशेने होत असल्याची निश्चिती होणे : संकलनाची सेवा करतांना ‘योग्य लिखाण (मजकूर) कसे निवडावे ? मोठी वाक्ये लहान आणि सुटसुटीत कशी करावी ? सूत्रांना मथळे कसे द्यावेत ? कोणती वाक्ये अवतरण चिन्हात घ्यावीत ?’, या गोष्टी माझ्या आपोआप लक्षात येऊ लागल्या. संकलन सेवा करतांना मनाला चांगली स्पंदने जाणवली, की संकलन योग्य दिशेने होत असल्याचे लक्षात येते. याउलट संकलन चुकीचे होत असल्यास मनाला त्रासदायक स्पंदने जाणवतात आणि मनाला अडखळल्यासारखे होते. तेव्हा थोडे थांबून प्रार्थना केल्यावर ‘नक्की कुठे चूक झाली आहे ?’, हे लक्षात येते. चूक सुधारली की, मनाला चांगली स्पंदने जाणवतात. यातून संकलन सेवा योग्य दिशेने होत असल्याची निश्चिती होते.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०१९)
भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449725.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |