कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !
कालच्या लेखात आपण कर्मांचे प्रकार, कर्माचा उद्देश, कर्मयोगाविषयी विवेचन, कुंडलीतील कर्मस्थान, कर्मस्थानावरून कोणत्या गोष्टींचा बोध होतो ? आणि कुंडलीतील कर्मस्थान (दशम स्थान) दर्शवणारी आकृती यांविषयी माहिती पाहिली. उर्वरित भाग आजच्या लेखात पाहूया.
भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449234.html
७. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक कर्माशी संबंधित असणारे ग्रह
७ अ. शनि : व्यक्तीच्या स्वकर्माचा स्वामी ‘शनि’ ग्रह आहे.
७ आ. रवि : पितृकर्माचा (पित्याचे शुभ-अशुभ पूर्व कर्म) स्वामी ‘रवि’ ग्रह आहे.
७ इ. चंद्र : मातृकर्माचा (मातेचे शुभ-अशुभ पूर्व कर्म) स्वामी ‘चंद्र’ ग्रह आहे.
७ ई. शुक्र : पती-पत्नी संबंधित पूर्वकर्माचा स्वामी ‘शुक्र’ ग्रह आहे. त्याप्रमाणे संपूर्ण घराण्याचे पूर्वकर्म दर्शवणारा स्वामीही ‘शुक्र’च आहे.
७ उ. गुरु : संतती संबंधित पूर्वकर्माचा स्वामी ‘गुरु’ ग्रह आहे.
७ ऊ. मंगळ : वास्तू दोष किंवा भूमी दोष यांच्याशी संबंधित कर्माचा स्वामी ‘मंगळ’ ग्रह आहे.
८. कर्मस्थानाचे कारक ग्रह, म्हणजे त्या स्थानात महत्त्वाचे ठरणारे ग्रह आणि त्या ग्रहाशी संबंधित व्यक्ती
कर्मस्थानाचे कारक ग्रह रवि, शनि, बुध आणि गुरु आहेत.
८ अ. कर्मस्थानाचे कारक ग्रह
८ अ १. रवि : आत्मिक तेजाचा कारक ग्रह ‘रवि’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती उत्तम नेतृत्व करते. हा सत्तेची आवड दर्शवतो.
८ अ २. शनि : कर्माचा कारक ग्रह ‘शनि’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती कठोर परिश्रमाने फलप्राप्ती करणारी, तसेच इतरांकडून कर्म करून घेणारी असते.
८ अ ३. बुध : बुद्धीचा कारक ग्रह ‘बुध’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती अभ्यासू वृत्तीने आणि तर्कशास्त्राचा विचार करून कृती करणारी असते.
८ अ ४. गुरु : विद्या आणि ज्ञान यांचा कारक ग्रह ‘गुरु’ कर्मस्थानात असल्यास व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करणारी, ज्ञानाचा प्रसार करणारी आणि शुभ कर्म करणारी असते.
८ अ ५. मंगळ : कर्मस्थानातील शुभ मंगळ व्यक्तीला क्रांतीकारक ठरतो.
८ आ. कारक ग्रहाशी संबंधित देवता, संत आणि काही मान्यवर व्यक्ती
८ आ १. कर्मस्थानात रवि असलेले : प्रभु श्रीरामचंद्र, आद्य शंकराचार्य, संत रामदास स्वामी, बिडकर महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षि धोंडो केशव कर्वे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. नितू मांडके, पंडित शौनक अभिषेकी इत्यादी.
८ आ २. कर्मस्थानात शनि असलेले : थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती, गुरुनानक, संन्यासी, स्वामी, करपात्री महाराज, स्वामी विवेकानंद, मेहरबाबा, प.प. श्रीधर स्वामी, संत वाङ्मयाचे अभ्यासक ले. रा. पांगारकर, इतिहास संशोधक वि.का. राजवाडे, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक भालजी पेंढारकर, मा. यशवंतराव चव्हाण इत्यादी.
८ आ ३. दशमात बुध असलेले : प्रभु श्रीरामचंद्र, संत रामदास स्वामी, ‘भूदान चळवळी’चे जनक आचार्य विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्, पद्मविभूषण प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉ. वामन पटवर्धन, इतिहासतज्ञ वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक पु.ना. ओक, महर्षि धोंडो केशव कर्वे इत्यादी.
८ आ ४. दशमात गुरु असलेले : संत रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, स्वामी लोकनाथ तीर्थ, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, उद्योगपती धीरुभाई अंबानी इत्यादी.
९. कर्मस्थानातील ग्रह स्वगृही असणे
कुंडलीतील कर्मस्थानाचा अधिपती कर्मस्थानात, म्हणजे स्वगृही असेल, तर व्यक्ती कर्तृत्ववान असते. अशी काही नावे पुढे दिली आहेत.
१०. दशमस्थानाच्या अनुषंगाने कुंडलीतील स्थानांचा विचार दर्शवणारी आकृती
११. जन्मकुंडली ६५ टक्के ‘प्रारब्धकर्म’ आणि ३५ टक्के ‘क्रियमाण कर्म’ दर्शवते !
व्यक्तीची जन्मकुंडली ‘व्यक्ती पूर्वजन्मीच्या कोणत्या कर्मांची शिदोरी घेऊन जन्माला आली आहे ? आणि या जन्मात त्या शिदोरीचा कसा भोग अन् उपभोग घ्यायचा आहे ?’, हे दर्शवते. कर्माला प्रतिसाद देण्याचे काम नियती करत असली, तरीही सद्सद्विवेकबुद्धी वापरून आणि ईश्वराचे अधिष्ठान ठेवून कर्म केल्यास ईश्वरप्राप्ती होऊन सत्-चित्-आनंदाची प्राप्ती होते. कुंडलीतील पूर्वकर्मांनुसार मिळालेल्या गोष्टी (प्रारब्धकर्म) ६५ टक्के, तर या जन्मात करावयाच्या गोष्टी (क्रियमाण कर्म) ३५ टक्के असतात.
१२. पूर्वकर्मांनुसार मिळालेल्या गोष्टी दर्शवणारी कुंडलीतील स्थाने
१२ अ. प्रथम स्थान : यावरून ‘व्यक्तीचे रंगरूप, तसेच उंची कशी असेल ?’, हे कळते.
१२ आ. द्वितीय स्थान : स्वतःचे कुटुंबीय कसे असतील ? कौटुंबिक धन मिळेल का ?
१२ इ. तृतीय स्थान : भावंडे किती आणि कशी असतील ?
१२ ई. चतुर्थ स्थान : कोणत्या आई-वडिलांच्या उदरी जन्म घेणार ? गृहसौख्य कसे असणार ?
१२ उ. पंचम स्थान : शिक्षणाची आवड, तसेच संततीची संख्या आणि ती कशी असेल ? प्रेमसंबंध कसे असतील ?
१२ ऊ. षष्ठ स्थान : संभाव्य आजार आणि अनुवंशिकता
१२ ए. सप्तम स्थान : पती किंवा पत्नी यांचे सुख किती मिळेल ?
१२ ऐ. अष्टम स्थान : आयुष्य किती असेल ?
कुंडलीतील १२ पैकी ८ स्थाने, म्हणजे ६५ टक्के भाग ‘प्रारब्ध’ दर्शवतो आणि उर्वरित ४ स्थाने ‘क्रियमाण कर्म’ दर्शवतात. या जन्मात व्यक्ती जे कर्म करणार, त्याला भाग्यस्थानाची साथ मिळून तिने शुद्ध भावनेने केलेल्या कर्मानुसार तिला होणारे लाभ आणि व्यय हे अनुक्रमे लाभस्थान अन् व्ययस्थान यांवरून अभ्यासले जातात.
१३. कर्मस्थानाला पोषक असणारी इतर स्थाने
कर्मस्थानाचा विचार करतांना अकर्मकर्म होण्यासाठी कुंडलीतील पुढील तीन स्थानांचा विचार करणे आवश्यक आहे.
१३ अ. तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे षष्ठ स्थान ! : तृतीय स्थानावरून भावंडे, शेजारी, पराक्रम आदी अभ्यासले जाते. षष्ठ स्थानावरून स्पर्धक, शत्रू, रोग आदी अभ्यासतात. तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे षष्ठ स्थान असल्याने योग्य कर्म होण्यासाठी भावंडे, तसेच शेजारी यांची संगत चांगली असणे आणि योग्य पराक्रम घडणे आवश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडते, तेव्हा अनेक स्वभावदोषांमुळे ती नकळत कर्मबंधनांत अडकते. यासाठीच तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे शत्रू स्थान आहे.
१३ आ. चतुर्थ स्थान हे कर्मस्थानाचे सप्तम स्थान ! : चतुर्थ स्थानावरून माता, मन, सुख आदींचा बोध होतो. सप्तम स्थानावरून जोडीदाराचा बोध होतो. व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होण्यासाठी त्याच्या सतत सोबत असणारे त्याचे ‘मन’ हे जोडीदार असते. प्रत्येक कर्म करतांना बाह्य मनाऐवजी अंतर्मनाचे साहाय्य घेतल्यास हातून योग्य कर्म घडते.
१३ इ. पंचम स्थान हे कर्मस्थानाचे अष्टम स्थान ! : पंचम स्थानावरून विद्या, संतती, तसेच मागील जन्मांतील साधना यांचा बोध होतो. अष्टम स्थान मृत्यू दर्शवते. योग्य साधनेच्या आधारे कर्म केल्यास व्यक्ती जन्म-मरणाच्या फेर्यांतून सहज मुक्त होऊ शकते.
कुंडलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार त्रिकोणांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्वरचरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होणे आवश्यक आहे.’ (समाप्त)
– सौ. प्राजक्ता जोशी, ‘ज्योतिष फलित विशारद’ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०१९)