राज्यातील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला शासन चालना देणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री
तीर्थक्षेत्रांचा विकास करतांना तेथे साधनेसाठी पोषक वातावरण राहील, याची शासनाने दक्षता घ्यावी. यासाठी शासनाने आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांकडून मार्गदर्शन घेतल्यास तीर्थक्षेत्रातील पावित्र्य टिकून रहाण्यास साहाय्य होईल !
मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये शासन आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटन यांना चालना देणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (पुणे) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २८ कोटी ४८ लाख रुपये निधीचे वितरण होणार
श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर येथील विकासासाठी २६० कोटी ८६ लाख रुपयांचा तीर्थक्षेत्रे विकास आराखडा संमत करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत २८ कोटी ४८ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर हे राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील लक्ष्मी-नृसिंह मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. भीमा आणि निरा नदीच्या संगमावर वसलेल्या या तीर्थक्षेत्राचे पर्यटनदृष्ट्याही महत्त्व आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून, तसेच भाविक आणि पर्यटक यांना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन या तीर्थक्षेत्रास आध्यात्मिक पर्यटनस्थळांच्या नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. पुढील आर्थिक वर्षामध्येही या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी उर्वरित निधीची तरतूद करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.