मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही ! – छगन भुजबळ

नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

पुणे – साहित्य संमेलनाला कोणाला बोलवायचे हा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा आहे. मंचावर होणार्‍या कार्यक्रमात ढवळाढवळ करणार नाही. मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही. नाशिककर या नात्याने माझे काम केवळ स्वागताचे आणि आदरातिथ्य करण्याचे आहे, असे आगामी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांच्या निवडीने व्यासपीठावर पुन्हा राजकीय गर्दी होणार, असे बोलले जाऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

२६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा सत्कार भुजबळ यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी या दिवशी आयुका येथे झाला. भुजबळ यांनी डॉ. जयंत आणि गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर या उभयतांना संमेलनाचे आमंत्रण दिले.

भुजबळ म्हणाले की, नारळीकर यांच्या निवडीने साहित्यिक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली मंडळी, तसेच नाशिककर यांना आनंद झाला आहे. तसेच नाशिककर म्हणून संमेलनाच्या यशस्वितेसाठी शक्ती पणाला लावणार असल्याची घोषणा त्यांनी केली.