व्यक्त आणि अव्यक्त !
देहलीतील शेतकरी आंदोलन प्रतिदिन नवनवी वळणे घेत तेथील आणि राष्ट्रीय पातळीवरील वातावरण तापते ठेवत आहे. या आंदोलनाविषयी कुणी मते व्यक्त केल्यावर मत व्यक्त करणार्याची पात्रता, त्याच्या पाठीमागचे वलय यांनुसार तो विषय पुढे कसा पेटणार, हे ठरते. काही दिवसांपूर्वी रिहाना नावाच्या पॉप गायिकेने शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केल्यावर शेतकर्यांच्या बाजूने असणार्या अनेकांना जोर चढला. तेवढ्याच जोरकसपणे राष्ट्रप्रेमींनीही त्याला प्रतिसाद दिला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांतील एक. पॉप गायिकेने तसे स्वत:चे मत व्यक्त न करता अन्य वृत्त संकेतस्थळावरील लेखाला टॅग करत इतरांना भडकावण्याचे काम केले; जे अधिकच निषेधार्ह आहे. इंडिया अगेन्स्ट प्रपोगंडा, इंडिया स्टॅण्डस् टुगेदर असे ट्विटरवर हॅशटॅग वापरून चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी या आंदोलनाआडून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेली अपकीर्ती रोखण्याचा प्रयत्न केला. सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, अक्षयकुमार, विराट कोहली ही त्यातील काही नावे; मात्र यामुळे काहींच्या पोटातही दुखले.
देशप्रेमी आणि देशविरोधी
पोटात दुखणार्यांंपैकी एक नेते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकर यांनी सरकारच्या बाजूने ट्वीट केल्यामुळे स्वत:चे क्षेत्र सोडून मत व्यक्त करतांना काळजी घे, असा सल्ला त्यांना दिला आहे. काही पुरोगाम्यांकडून लता मंगेशकर यांच्याविषयी त्यांनी असे मत व्यक्त करायची आवश्यकता काय ?, रिहानाचे एवढे मनावर का घ्यायचे ?, अनुल्लेखाने मारावे असे तार्किक मांडले आहे. म्हणजे रिहाना जी पॉप गायिका आहे, ती एखाद्या विषयावर व्यक्त झाली, तर ती तिची भूमिका समजणार, तिने कशाप्रकारे चांगले काम केले, हे सांगणार आणि भारतात त्या विरोधात काही प्रतिक्रिया आल्यावर ते चुकीचे म्हणणार, असा दुट्टप्पीपणा कशासाठी ? ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या टूलकिटमध्ये आंदोलनात शेतकर्यांची संख्या कशी वाढवायची ?, आंदोलन करतांना अडचण आल्यास कुणाशी संपर्क साधावा ?, आंदोलनात काय करावे आणि काय करू नये, याविषयी सर्व मार्गदर्शक सूचना होत्या. आता कुठल्या देशातील ती ग्रेटा आणि तिच्या हातात आंदोलनाविषयी सर्व माहिती पडते. आंदोलन कसे वाढवायचे याची माहिती मिळते. हे आंतरराष्ट्रीय कटकारस्थान नाही तर काय आहे ? या आंदोलनात प्रत्यक्ष खलिस्तानवादी सहभागी आहेत, हे अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट असतांना आंदोलनाविषयी ममत्व का बाळगले जाते, याचे उत्तर ग्रेटाच्या ट्वीटमध्ये मिळते.
ग्रेटाच्या टूलकिटमधील धक्कादायक माहिती उघड झाल्यावर आता वलयांकित नावे असलेल्या व्यक्ती मूग गिळून गप्प का ? २६ जानेवारीला शेतकर्यांच्या आड समाजकंटकांनी जो देहलीत गोंधळ घातला, लाल किल्ल्यावर शिखांचा ध्वज फडकावला. आता बोलणार्यांना तेव्हा व्यक्त होण्यास भीती वाटली का ? अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्वीट करून त्यावर प्रखर टीका केली; मात्र याच्या परिणामस्वरूप ५ विज्ञापन आस्थापनांनी तिच्याशी असलेले करार मोडले. देशप्रेमी असणे हा गुन्हा आहे का ? कुणी देशाच्या अथवा सरकारच्या बाजूने बोलले म्हणजे तो भाजप अथवा त्यांच्या कंपूतला आणि जो आंदोलकांच्या बाजूने बोलेल तो आपला (म्हणजे पुरोगाम्यांचा). अशी काहीशी विभागणी झालेली या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.
दुसरीकडे पाकमध्ये घरजावयासारखी वागणूक मिळणारे नसीरुद्दीन शहा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळी ७ पिढ्या बसून खातील एवढे कमावले असल्याने त्यांना शेतकरी आंदोलनाविषयी व्यक्त व्हावे, असे वाटत नाही, अशी टीका केली आहे. या मंडळींनी व्यक्त होणे म्हणजे अर्थातच शेतकरी आंदोलनाच्या बाजूने आणि सरकारच्या विरोधात बोलणे, असेच त्यांना अपेक्षित आहे. पाक आणि भारत यांचा विषय आल्यावर अन् पाकच्या अत्याचारांचा पाढा वाचल्यावर नसीरुद्दीन हे नेहमी पाकचे गोडवे गाण्यात धन्यता मानतात. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने आलेली चांगली संधी ते कशी सोडतील ? रिहाना, ग्रेटा यांनी जशी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, तोच कित्ता भारतनिवासी नसीरुद्दीन करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळी सरकारच्या बाजूने व्यक्त झालेलीच आहेत. याकडे ते जाणूनबुजून कानाडोळा करतात. राष्ट्रीय प्रश्नांविषयी योग्य पद्धतीने व्यक्त होण्यासाठी आणि त्यात राष्ट्रीय दिशा घेण्यासाठी प्रखर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती मनात भरलेली असावी लागते. कोण काय बोलतो, कोण काय सांगतो, यापेक्षा राष्ट्रीय दृष्टीने काय योग्य हे कोणतीही भीड न बाळगता सांगता येणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे हसेच होणार किंवा जनतेच्या रोषाला तरी सामोरे जावे लागणार, हे येथे नमूद करावेसे वाटते.