साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

(भाग १)

१. नकारात्मकता म्हणजे काय ?

श्री. अशोक लिमकर

नकारात्मकता ही मनाची स्थिती आहे. पुढील विचारांना नकारात्मकता म्हणता येईल.

अ. माणसाच्या मनात चाललेली उलट विचारांची प्रक्रिया

आ. देवाला आणि माणसाला अपेक्षित नसलेले विचार मनात येणे

इ. मनुष्याला कर्तव्य करण्यापासून दूर नेणारे विचार

ई. माणसाला देवापासून दूर नेणारे विचार

उ. माणसाला जीवनातला आनंद घेऊ न देणारे विचार

ऊ. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारे विचार

ए. आनंद मिळवण्यासाठी धडपडायचे असते, हे विसरून टाकणारे विचार

२. नकारात्मक विचार का आणि केव्हा मनात येतात ?

अ. देवावरचा विश्‍वास डळमळीत असणे आणि श्रद्धेचा अभाव

आ. स्वतःच्या कर्तृत्वाविषयी साशंकता

इ. आत्मविश्‍वासाचा अभाव

ई. स्वभाव संशयी

उ. संबंधित व्यक्तीविषयी प्रेमभाव, आपुलकी किंवा जवळीक नसणे

ऊ. परिस्थिती सारखीच असली, तरी तिच्यात अनेक पालट होतील, अशी कल्पना करणे किंवा गृहित धरणे

ए. अनावश्यक विचारप्रक्रिया

ऐ. विचारांना कल्पनेचे अनेक फाटे फुटत जाणे

३. नकारात्मकतेची कारणे

३ अ. न्यूनगंड हा स्वभावदोष प्रबळ असणे : व्यक्तीत न्यूनगंड हा स्वभावदोष प्रबळ असल्यास तिच्या मनात नकारात्मक विचार येण्याचे प्रमाण अधिक असते. न्यूनगंड म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीसारखीही गुणवैशिष्ट्ये माझ्यात नाहीत किंवा त्यांची उणीव अधिक आहे. त्यामुळे मला काही येत नाही. मला इतरांसारखे काही करणे जमत नाही, असे वाटणे. अशा विचारांमुळे ती व्यक्ती कोणतीही कृती करायला सिद्ध होत नाही. सर्व प्रयत्न आणि कृती थांबल्याने त्या व्यक्तीला जगणे नकोसे वाटते. ती व्यक्ती मनोरुग्ण होते. तिचे जीवन वाया जाते.

३ आ. मन, बुद्धी आणि शरीर यांचा वापर करणे टाळणे : न्यूनगंड असलेली आणि नकारात्मक विचार करणारी व्यक्ती मनाची शक्ती हरवून बसते. देवाने दिलेली इंद्रिये आणि अवयव यांचा उपयोग करून काहीतरी करायचे असते, हेच ती विसरून जाते. अशी व्यक्ती देवाने दिलेले शरीर आणि इंद्रिये यांचा वापर करत नाही. त्यामुळी ती देवाचेही आज्ञापालन करत नाही. ती व्यक्ती संचित भोगून संपवण्याची देवाने दिलेली संधी गमावते. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांची संख्या वाढवत रहाते. देवाने दिलेले मन, बुद्धी आणि शरीर यांचा वापर करणे टाळते. त्यामुळे ती ऐहिक जीवनही सुखेनैव जगू शकत नाही.

३ इ. स्वतःला न्यून लेखणे : ८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म मिळतो. देवाने मनुष्याला दिलेले हे सुंदर शरीर, मन आणि बुद्धी स्वतःला न्यून लेखल्यामुळे वाया जाते, हे त्याला समजत नाही. ८४ लक्ष योनींतील सर्व जिवांमध्ये मनुष्यप्राणी सर्वश्रेष्ठ समजला जातो. मनुष्यात आकाशाला गवसणी घालण्याची क्षमताही आहे. स्वतःला न्यून लेखणे, म्हणजे त्या सृष्टीनिर्मात्याचा अपमान करण्यासारखेच आहे.

​स्वतःला न्यून लेखणारी व्यक्ती आत्मविश्‍वास गमावून बसते. अनावश्यक विचार करत राहिल्याने मला एखादी गोष्ट जमेल का ? मी ती गोष्ट करू शकेन का ?, अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यामुळे ती व्यक्ती आपली इच्छा आणि कार्यशक्ती गमावते. तिचा स्वतःवरचाही विश्‍वास ढळतो. त्यानंतर मला काही येत नाही. मला काही जमत नाही. माझी काही करण्याची क्षमता नाही, असे तिचे नकारात्मक विचार वाढत जातात आणि अशी व्यक्ती निष्क्रीय बनते.

३ ई. शिकण्याची वृत्ती नसणे : जिज्ञासा अल्प असणार्‍या व्यक्तीमध्ये शिकण्याच्या वृत्तीचा अभाव असतो. त्यामुळे शिकण्यातील आणि नवीन ज्ञान मिळण्यातील आनंद त्या व्यक्तीला मिळत नाही. अपुर्‍या ज्ञानामुळे तिच्याकडून अनेक चुका होतात. चुका झाल्यावर ती व्यक्ती स्वतःवरच चिडते, निराश होतेे आणि मला काहीच जमत नाही, या नकारात्मक विचाराने काही कृती करण्याचे टाळते. अशा व्यक्तीला समाधान आणि शांती कसे मिळणार ? माणसाने प्रतिदिन काहीतरी शिकल्यास किंवा नवीन कृती करण्याचा प्रयत्न केल्यासच सकारात्मक वृत्ती वाढण्यास साहाय्य होते.

३ उ. आळशीपणा : आळशी माणसाला विद्या मिळत नाही. विद्या, कला आणि ज्ञान यांचा अभाव असणार्‍या व्यक्तीला धनप्राप्ती होत नाही. ज्याच्याकडे धन नाही, त्याला सुख कुठून मिळणार ? दुःखामुळे गांजलेली व्यक्ती सकारात्मक राहू शकत नाही. ती व्यक्ती सर्वांवर राग काढते. नकारात्मक विचारांमुळे ती व्यक्ती स्वतःवर आणि इतरांवर चिडते. ती सारासार विचार करू शकत नाही. तिचा सर्वांना त्रास होतो. कुटुंबीय आणि समाजातील व्यक्ती त्या व्यक्तीला वाया गेली, असे म्हणतात.​

तमोगुण अधिक असणार्‍या व्यक्तीमध्ये रजोगुण अल्प असतो. असा मनुष्य आळशी आणि काम न करणारा असतो. तो काहीतरी उचापती करून स्वतःला त्रास करून घेतो आणि दुसर्‍यालाही त्रास देतो. अशा माणसाचे विचार सरळ आणि सकारात्मक कधीच नसतात. सतत नकारात्मक स्थितीत राहिल्याने ती चांगले कर्म करण्याचे विसरून जाते. कुटुंब आणि समाज यांतील व्यक्तींवर प्रेम करावे, हा विचार तिच्या मनाला शिवत नाही. तिच्या मनातील नकारात्मक विचार तिला आणखी वाईट कृती करायला भाग पाडतात.

४. नकारात्मकतेचे दुष्परिणाम

अ. माणसाला दैनंदिन जीवन जगण्यातील आनंद घेता येत नाही.

आ. मनुष्य कृतीहीन, निराश आणि दुःखी होतो.

इ. मनुष्य प्रेम देऊ शकत नाही आणि कुणाचे प्रेम मिळवू शकत नाही.

ई. अशा माणसाला व्यवहार चांगला करता येत नाही आणि परमार्थ करण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही.

उ. मनुष्य निराशावादी आणि वैफल्यग्रस्त होऊन जीवनाला कंटाळतो.

ऊ. त्याच्या मनात जीवनाचा स्वतःहून अंत करावा, असे विचार येतात.

ए. त्याच्याकडून कुटुंब आणि नोकरी यांतील कर्तव्ये अपेक्षित अशी पार पाडली जात नाहीत. त्याची फलनिष्पत्ती अल्प झाल्याने त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

ऐ. अशी व्यक्ती मानसिक ताणाखाली राहिल्याने तिच्याकडून कोणताही सकारात्मक विचार किंवा सकारात्मक कृती होत नाही.

ओ. नकारात्मकतेचा दुष्परिणाम माणसाचे मन आणि शरीर यांवर होतो. त्याची कार्यक्षमता (मानसिक आणि शारीरिक) उणावून त्याला नैराश्य येते.

औ. व्यक्ती साधनेपासून, म्हणजेच देवापासून दूर जाते.

अं. त्या व्यक्तीची कुणाशीही जवळीक साधली जात नाही.

क. असा माणूस कुटुंब आणि समाजातील व्यक्ती यांपासून दुरावला जातो. त्याचे देवाण-घेवाण हिशोब फेडणे प्रलंबित रहाते.

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.७.२०१७)

(क्रमशः)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449594.html