(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल !’
|
मुंबई – देशात सध्या आणीबाणी नसली, तरी बहुमताच्या जोरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. कायदा आणि अधिकार यांचाही दुरुपयोग केला जात आहे. बहुमताच्या विरोधात आवाज उठवणार्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. देशातील न्यायव्यवस्थाही अभिव्यक्ती आणि माध्यमे यांच्या स्वातंत्र्यासह आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य, सर्जनशीलता यांना वाव मिळण्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली असून ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन्. राम आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केले. (देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ? – संपादक) ‘क्रिमिलायझिंग जर्नालिझम अॅण्ड सिनेमा’ या विषयावर आयोजित वेबसंवादामध्ये राम आणि सिब्बल यांनी देशातील सद्य:स्थिती, न्यायव्यवस्थेची भूमिका यांविषयी त्यांचे मत व्यक्त केले. पटकथा लेखक ज्योती कपूर याही या वेबसंवादात सहभागी झाल्या होत्या.
आणीबाणीचा काळ आपण जवळून अनुभवलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध कसे असतात, हे पाहिलेले आहे. सध्या तशी स्थिती नाही; परंतु ज्याप्रकारे बहुमतवादाच्या विरोधात बोलणारे पत्रकार आणि सर्जनशीलता यांचा ध्यास धरणार्यांना लक्ष्य केले जात आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जात आहेत, हे पहाता मूलभूत अधिकारांच्या कायद्यांमधील त्रुटी उघड होते. मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याविषयी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांमध्ये असलेला सातत्याचा अभावही या स्थितीसाठी कारणीभूत असल्याचे राम यांनी म्हटले.
( सौजन्य : LIVE LAW )
पटकथा लेखक ज्योती कपूर म्हणाल्या, ‘‘चित्रपटाची कथा लिहितांना यापूर्वीही निर्बंध होते; मात्र ‘तांडव’ या वेबमालिकेच्या वादानंतर निर्मिती संस्थांकडून पटकथा लिखाणाविषयी करारपत्रात नवा नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या नियमामुळे पटकथा लेखक प्रचंड दडपणाखाली आणि भीतीच्या छायेखाली आहेत.’’ (हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूंच ! ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान अन् विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे या वेबमालिकेला सर्वत्र विरोध करण्यात आला. पटकथा आणि लेखक यांचा एवढाच पुळका आहे, तर ज्योती कपूर या हिंदुद्वेषी पटकथाकारांना हिंदूंच्या धार्मिक भावना न दुखावणारे लिखाण करण्याविषयी उपदेश का देत नाहीत ? – संपादक) |