परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत अनुभवलेले काही भावक्षण !
विश्वव्यापक जगद्वंद्य परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. आदर्शातील आदर्श असती माझे गुरु ।
सामान्यातील सामान्य ।
असामान्यत्वातील असामान्यत्व ।
सर्व साधकांचा प्राण ।
सर्व जीवसृष्टीतील पुरुषोत्तम ॥ १ ॥
पानावरील दवबिंदूसम निर्मळ ।
अवर्णनीय ।
आदर्शातील आदर्श ।
अशा माझ्या गुरूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥ २ ॥
गुरूंविषयी लिहिण्याइतकी माझ्यात शुद्धता नाही. त्यांनीच माझ्याकडून कृतज्ञतास्वरूप लिहून घ्यावे, हीच भावपूर्ण प्रार्थना !
२. परात्पर गुरुदेवांची प्रथम भेट !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर नतमस्तक व्हावे, ही इच्छा पूर्ण होणे : मी भारतीय नौसेनेत सेवारत असतांना वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घ्यावे, हा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मी असोगा, तालुका खानापूर येथे घरी होतो. आम्ही (मी आणि माझा मित्र श्री. राजू सुतार) सुखसागर येथे जाऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे, असा विचार केला. त्यांच्यामुळेच आम्हाला येण्याची संधी लाभली. आम्ही अनुमाने सकाळी १०.३० वाजता सुखसागर येथे पोचलो. आम्हाला सनातन-निर्मित गणपतीचे चित्र आणि पंचमुखी हनुमानाची मूर्ती यांच्याकडे पाहून काय जाणवते ?, याविषयी विचारले. आम्ही त्याविषयी सांगितलेली सूत्रे योग्य होती.
मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाची उत्सुकता होती. दुपारी महाप्रसादाच्या वेळी साधेपणाने परात्पर गुरुदेव सर्वांसह पटलावर जेवायला बसले. आम्हाला त्यांचे दर्शन झाले; पण माझी त्यांना भेटून त्यांच्या चरणांवर डोके ठेवायची इच्छा होती. आम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांनी काही विचारायचे आहे का ?, असे विचारले. मी म्हटले, एकच इच्छा होती, तुमच्या चरणांवर नतमस्तक व्हावे. ती पूर्ण झाली. ते हसले. आम्ही निघतांना ते खोलीच्या दारापर्यंत आले. त्यांनी आमच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले, तेथेच दृष्टीतून गुरुकृपा झाली, असे मला वाटले.
२ आ. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले या साधकांना बस स्थानकावर चारचाकीने पोचवा, हे गुरुवाक्य सत्य ठरल्याची प्रचीती येणे : बस स्थानक सुखसागरपासून अगदी जवळ होते. त्यांनी एका साधकाला सांगितले, यांना चारचाकीने बस स्थानकावर पोचवा. आम्ही आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर पाहिले, तर तेथे चारचाकी नव्हती. मी म्हणालो, आम्ही चालत जातो. तेव्हा साधकांनी सांगितले, परात्पर गुरुदेवांनी सांगितले आहे, तसे होईलच. त्याच क्षणी एक ट्रॅक्स आली. ट्रॅक्स चालवणारे साधक म्हणाले, खरेतर गाडी दुरुस्तीसाठी जाणार होती; पण मेकॅनिकने अकस्मात् उद्या या, असे सांगितले; म्हणून आलो. गुरुवाक्य शब्दप्रमाण, हे शिकायला मिळाले.
२ इ. मी सुटीत घरी आल्यावर प.पू. बाबांची (प.पू भक्तराज महाराज यांची) भजने म्हणणे, तबला वाजवणे, असे करायचो. मी सुटीत घरी आल्यावर मला सुखसागर येथे जायची ओढ असायची.
३. परात्पर गुरुदेवांची दुसरी भेट !
३ अ. प्रत्येक पावलाला नामजप जोडायला परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे आणि त्याचे शास्त्र समजावून सांगणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांना दुसर्यांदा भेटल्यावर त्यांना विचारले, मी जहाजावर नोकरी करतो. मी कशी साधना करू ? तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, नामजप आणि ग्रंथवाचन करा. तुम्ही सैन्यात आहात ना. तुम्ही जसे लेफ्ट-राइट करता, त्याप्रमाणे एक पाऊल टाकले की, नामजप करायचा. दुसरे पाऊल टाकल्यावर पुन्हा नामजप करायचा. असे १५ दिवस केले की, तुमचा चालतांना जप होईल. चालणे रजोगुणी आहे. त्याला नाम (सत्त्वगुणी) जोडले, म्हणजे रजोगुणातून सत्त्वगुणाकडे प्रवास होईल. मी १५ दिवस तसे प्रयत्न केले आणि आपोआप माझा जप पावलागणिक चालू झाला. देवाने मला ही अनुभूती दिली. मी ग्रंथ-वाचन चालू केले. मी साधना आणि शंका निरसन यांच्या ध्वनीचकत्या ऐकू लागलो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझा नामजप व्हायचा.
– श्री. प्रणव मणेरीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२०)