केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला दिलासा, मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहिल्याची उद्योजकांची खंत
कोल्हापूर – देशात नवीन टेक्स्टाईल पार्क चालू करणे, कृत्रिम धागा कर अल्प करण्याचा निर्णय घेऊन केंद्र शासनाने आताच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहिल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली आहे. दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर उद्योगाला गती मिळाली आहे; परंतु कापूस, सुताचे चढे भाव आणि कापडाला अपेक्षित न मिळणारी किंमत यामुळे एकूणच या क्षेत्रातील उलाढाल अल्प होत आहे.
यामुळे देशातील काही केंद्रांमध्ये उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पामध्ये मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क (मित्रा) ची घोषणा केली आहे. या माध्यमातून ७ मेगा टेक्स्टाईल पार्क देशात चालू केले जाणार असून येथे वस्त्रोद्योगच्या एकात्मिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एकत्रित पोर्टल चालू केले जाणार आहे. या सर्व तरतुदींचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि फडणवीस शासनाच्या काळातील वस्त्रोद्योग धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले आहे.
सुतापासून तयार कपडे होईपर्यंतच्या विविध टप्प्यांवर जी.एस्.टी. कर प्रणाली आकारणी अल्प-अधिक असल्याने त्याचा वस्त्रोद्योगाला मोठा त्रास होत आहे, तसेच वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी टफ (टेक्निकल अपग्रेडेशन फंड) ही योजना राबवली जाते. या वेळी त्याचा उल्लेख आताच्या अर्थसंकल्पात झाला नसल्याने वस्त्र उद्योजक संभ्रमात आहेत.