घरपट्टी थकबाकीदारांच्या नावांचा फलक हिंगोली पालिकेने सार्वजनिक चौकात लावला
पालिकेवर अशी वेळ येणे दुर्दैवी !
हिंगोली – शहरातील घरपट्टीच्या थकबाकीदार नागरिकांकडील वसुलीसाठी हिंगोली पालिकेने थकबाकीदारांच्या नावांचे फलक (बॅनर) सिद्ध करून सार्वजनिक चौकात लावले आहेत. पालिकेचे हे फलक पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. हिंगोली शहरातील नागरिकांना सर्व नागरी सुविधा दिल्या जात असतांनाही घरपट्टीची थकबाकी मात्र वाढलेली दिसत आहे.
सध्या शहरातील २० सहस्र नागरिकांकडे घरपट्टीची ३.५० कोटी रुपयांची चालू बाकी आहे, तसेच ३.५० कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी शहरातील नागरिकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन केले होते. शहरातील सर्व प्रभागांतून कचरा गोळा करण्यासाठी जाणार्या घंटागाड्यांच्या माध्यमातूनही घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र त्यानंतरही नागरिकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी शहरातील ८० थकबाकीदार नागरिकांचे फलक सिद्ध करून ते शहरातील महात्मा गांधी चौकात लावले आहेत.