(म्हणे) गोमंतकीय जनता काँग्रेसवर विश्वास ठेवील, असा पक्षात पालट करू ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेस
पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – गोमंतकियांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा, असा पालट काँग्रेस पक्ष पक्षांतर्गत करणार आहे. वेळप्रसंगी यासाठी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी चेतावणी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्षाने पक्षाचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीची नुकतीच स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर दिनेश गुंडू राव बोलत होते.
दिनेश गुंडू राव पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष बळकट करणे, हे आमचे पहिले प्राधान्य आहे. काँग्रेस पक्ष पूर्वी केलेल्या चुका आता पुन्हा करणार नाही. (काँग्रेस तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, साम्यवाद्यांशी असलेली जवळीक, हिंदुद्वेष आदी चुका सुधारत नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये पालट होणे शक्य नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, त्याप्रमाणे भारतात राहून हिंदुद्वेष करू नये. तसे केल्यास काय होते, ते गेल्या १० वर्षांत हिंदूंनी काँग्रेसला दाखवून दिले आहे. – संपादक) गोवा प्रदेश काँग्रेस समिती, गट समिती आणि जिल्हा समिती पुन्हा नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. पक्षाची सदस्यता मोहीम १० मार्चपर्यंत चालणार आहे.