धाटवाडी येथे ग्रामस्थांनी कालव्यात उतरून आंदोलन केल्यावर १५ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन : आंदोलन मागे
आंदोलन केल्यावर १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देणारे प्रशासन हे काम आधी का करू शकले नाही ? अशा प्रकारे प्रशासन आंदोलन करा मग मागण्यांची पूर्तता होईल, अशी नवीन कार्यपद्धत घालत आहे का ?
दोडामार्ग – तिलारी धरणाच्या धाटवाडी येथील कालव्याची दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी कालव्यात उतरून आंदोलन चालू केले होते. तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही. आजगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन १२ फेब्रुवारीपासून कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
दोडामार्ग-धाटवाडी येथील कालवा ढासळल्याने ६ फेब्रुवारीला माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत होते. (आतापर्यंत अनेक वेळा तिलारी धरणाच्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तो अनेक ठिकाणी ढासळून हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडतही आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला कालव्याच्या गुणवत्तेविषयी उपाययोजना करावी, असे वाटत नाही का ? की कालवा ढासळून मोठी हानी होण्याची वाट प्रशासन बघत आहे ? – संपादक) जोपर्यंत पहाणी होऊन कामास प्रारंभ होत नाही, तोपर्यंत कालव्यातून पाणी सोडण्यास देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता आजगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या वेळी कालव्याचे ढासळलेले बांधकाम, खराब अस्तरीकरण, लोंखडी पादचारी पूल खराब झाल्याचे अधिकार्यांनी मान्य केले आणि १२ फेब्रुवारीला यंत्रसामग्री आणून कालव्याची साफसफाई करू अन् कालव्याची दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले.
या वेळी माजी नगरसेविका हर्षदा खरवत, बाबु खरवत, चंद्रकांत खडपकर, रामा गवस, दिनकर उगवेकर, नंदन नाईक, आनंद ताटे, संजय गवस, नंदू परीट, धीरज नानचे उपस्थित होते.
तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा चालू !
तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचा काही भाग खानयाळे येथे ढासळला होता. घटनेच्या १२ दिवसांनंतर ६ फेब्रुवारीला दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर कालव्यात पाणी सोडण्यात आले. कालव्यातील पाणीपुरवठा सुरळीत केल्याने शेतकरी बागायतदार यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.