राज ठाकरे यांना जामीन संमत
वाशी पथकर नाका तोडफोड केल्याचे प्रकरण
नवी मुंबई – येथील वाशी पथकर नाका तोडफोड केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर संमत केला. या वेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे या दिवशी होणार आहे. यानंतर न्यायालयाकडून साक्षीदारांना समन्स देण्यात येईल आणि खटल्याला प्रारंभ होईल. या वेळी राज ठाकरेसमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसेेचे नेते बाळा नांदगावकर, नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष गजानन काळे उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ?२६ जानेवारी २०१४ या दिवशी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पथकरनाक्यावरून ‘सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घडवा’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर काही वेळातच नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी खाडी पुलावरील पथकर नाक्याची जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, गजानन काळे यांसह एकूण ७ जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता; मात्र याविषयी अनेक वेळा राज ठाकरे यांना पोलिसांनी समन्स देऊनही ते न्यायालयात उपस्थित न राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. येत्या ६ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने ठाकरे यांना दिले होते. |
साैजन्य : टी.व्ही.9 मराठी