साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
नर्मदा नदीवर धरण बांधण्यास शंकराचार्यांचा विरोध
हे शंकराचार्यांना का सांगावे लागते ? सरकार आणि प्रशासन यांच्या लक्षात का येत नाही ?
जबलपूर (मध्यप्रदेश) – नर्मदा नदीच्या साहाय्यक नद्यांद्वारे अस्वच्छ पाणी नर्मदा नदीमध्ये पोचत आहे. ते रोखण्याची आवश्यकता आहे. नद्यांमध्ये नाल्यांचे पाणी मिसळणे देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले. या वेळी शंकराचार्यांनी नर्मदा नदीवर धरण बांधण्यास विरोध केला. ‘धरणामुळे पाणी खाली जाते आणि उष्णता वाढते, तसेच भूकंपाची शक्यताही अधिक असते’, असे ते म्हणाले. (हिंदु राष्ट्रात धरणांऐवजी तलाव आणि तळी निर्माण केली जातील ! – संपादक)
शंकराचार्य पुढे म्हणाले की,
१. हिरण नदीचे घाणेरडे पाणी नर्मदा नदीमध्ये मिसळले जात आहे. शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये मिळण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही उपाय केले जात नाहीत. याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी घेतले पाहिजे. नर्मदा नदीला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येक व्यक्तीची तिच्यावर श्रद्धा आहे.
२. लोकसंख्या वाढीमुळे नाल्यांची संख्याही वाढत आहे आणि त्यातील पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. ते रोखण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्प राबवले पाहिजे, जेणेकरून घाणेरडे पाणी नदीमध्ये जाणार नाही आणि नद्यांचे पाणी दूषित होणार नाही. जर पाणी दूषित झाले, तर व्यक्तीला चांगले जीवन आणि अन्न कसे मिळू शकेल ? नद्या स्वच्छ ठेवणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे.
मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार !
नर्मदा नदीमध्ये नाल्यांचे पाणी मिसळले जात आहे, याविषयी मुख्यमंत्र्यांना मी सांगितले होते. तेव्हा त्यांनी जिल्हाधिकार्यांना शुद्धीकरण प्रकल्प बनवण्याचा आदेश दिला होता. यानंतर त्या दिशेने काही काम झाल्याचे दिसले नाही. हा गंभीर विषय आहे. नाल्यांतील पाणी नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी मी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन.