नाठाळाचे माथी हाणू काठी ।
कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्ष जगभरात हाहा:कार माजवला. चीनच्या वूहान प्रांतात या विषाणूचे उगमस्थान असून अनेक तज्ञ व्यक्तींनी हा चिनी वायरस असल्याचे म्हटले. यासंदर्भात मत-मतांतरे असली, तरी मानवावर ओढवलेल्या या संकटाचा सामना करणे, हा एकच पर्याय आपल्या सर्वांसमोर होता. या अनुषंगाने काही देशांनी कोरोनावर विजय प्राप्त करण्यासाठी कोरोना लस बनवण्यात पुढाकार घेतला आणि आता जागतिक स्तरावर लक्षावधी लोकांपर्यंत ही लस पोचलीही ! ही लस मिळावी म्हणून अनेक देशांनी इतर देशांकडे साहाय्यासाठी हात पसरले आहेत. सक्षम देशांनी तसे साहाय्य करण्यास आरंभही केला आहे. अर्थात् सर्व जगाला साहाय्य करण्यात भारत अग्रस्थानी आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
वसुधैव कुटुम्बकम् ।
देशात आतापर्यंत ५४ लाखांहून अधिक नागरिकांना ही लस देण्यात आली असून भारताने विविध देशांना अनुमाने लसीचे दीड कोटी डोस पुरवले आहेत. यामध्ये आतापर्यंत ५६ लाख लसी भेट स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारत हा भूतान, मालदीव, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, सेशेल्स, श्रीलंका, मॉरिशस या शेजारी अन् जवळ असलेल्या देशांसमवेतच निकारागुआ, मंगोलिया येथे ही लस भेट स्वरूपात पाठवत आहे. यात मध्य अमेरिका क्षेत्रात असलेले बार्बाडॉस, बहामास, गयाना आदी २० कॅरेबियन देश, तसेच न्यूझीलंड, फिजी, फ्रेंच पॉलिनेशिया, द मार्शल आयलंड्स आदी १५ पॅसिफिक महासागरातील बेट असलेल्या देशांचाही यात समावेश आहे. यासमवेतच ब्राझिल, मोरक्को, संयुक्त अरब अमिराती, ओमान, इजिप्त, अल्जेरिया, कुवेत, दक्षिण आफ्रिका यांना भारताकडून लसीचे एकूण १ कोटीहून अधिक डोस व्यावसायिक स्तरावर निर्यात करण्याची प्रक्रियाही चालू आहे.
भारताने उदार मनाने केलेल्या या साहाय्याचे अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले आहे. ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी यासाठी भारताचे आभार मानतांना भारतातून श्री हनुमान हातात संजीवनी असलेला डोंगर घेऊन ब्राझिलमध्ये येत आहे, असे दर्शवले आहे. अर्थात् येथे एखादा बुद्धीभेद करणारा उपटसुंभ म्हणेल की, जागतिक स्तरावर भारत हा औषधनिर्मिती करण्यात अग्रेसर देश आहे. त्यामुळे सर्वांना लस पुरवण्यात काय विशेष ! येथे एक गोष्ट आपण विसरता कामा नये. स्वास्थ्याशी संबंधित सुविधांचा स्तर पहाता कोरोना विषाणूने जगात सर्वाधिक होरपळून गेलेल्या देशांपैकी आपला एक देश होय. स्वत:च्या नागरिकांना सुरक्षित जीवन देण्याची भारताची क्षमता अनेक पाश्चात्त्य देशांपेक्षा पुष्कळ अल्प आहे. तसेच १३५ कोटी लोकसंख्या असलेले हे विशालकाय राष्ट्र असूनही ते अन्य राष्ट्रांना साहाय्य करते, यातच सर्वकाही आले. त्यामुळेच भारताने या माध्यमातून जगासमोर हिंदु धर्माच्या शिकवणीचा आदर्श कृतीतून स्थापित केला आहे. वसुधैव कुटुम्बकम् । म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, अशा माणुसकीच्याही पुढे घेऊन जाणार्या आपल्या शिकवणीचा प्रत्येक हिंदूनेच नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे.
मानवाधिकारांचे तुणतुणे !
स्वहित बाजूला सारून अखिल मानवजातीचे हित जपू पहाणार्या भारताला दुसर्या आघाडीवर मात्र विकृत स्वरूपात प्रसृत केले जात आहे. मानवाधिकारांचे तुणतुणे वाजवत आज पाश्चात्त्य देशांतील अनेक प्रतिष्ठित लोक भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करू पहात आहेत. देहलीत चालू असलेल्या कथित शेतकर्यांच्या आंदोलनाला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळत आहे. गंमत अशी की, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कलंकित करण्याचा हा कुटील डाव आहे. हे एक व्यापक षड्यंत्र आहे, हेही आता लपून राहिलेले नाही. स्वीडनची कथित निसर्गप्रेमी युवती ग्रेटा थनबर्गने देहलीतील आंदोलनाला समर्थन देत ट्विटरद्वारे एक टूलकिट प्रसारित केले. यातून संपूर्ण भारतविरोधी कटकारस्थान चव्हाट्यावर आले. या षड्यंत्राचे मास्टरमाईंड हे खलिस्तानवादी असून जगप्रसिद्ध पॉप गायिका आणि अभिनेत्री रिहाना यांनी त्यांच्या सांगण्यावरून भारतविरोधी गरळओक केली. रिहानाला भारतविरोधी एक ट्वीट करण्यासाठी २५ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच १८ कोटी भारतीय रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे ट्वीट केले होते. बार्बाडॉस या देशाच्या रिहानाने जिथे भारतविरोधी वक्तव्य केले, तिथे त्याच देशाचे पंतप्रधान मियां अमोर मॉटली यांनी मात्र भारतावर स्तुतीसुमने उधळली आहेत. कोरोनाच्या १० लाख लसी भेट दिल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ते म्हणाले, सर्वांत दानशूर होऊन आम्हाला लस पुरवल्याच्या निमित्ताने माझ्या लोकांच्या वतीने मी आपले, आपल्या शासनाचे आणि नागरिकांचे आभार मानतो.
कृष्णनीतीचे शस्त्र उगारणे आवश्यक !
ही सर्व परिस्थिती पहाता दुसर्याचे हित पहाणार्याच्या पाठीत तेच लोक खंजीर खुपसतात, हे लक्षात घेऊन भारताने संत तुकाराम महाराजांची शिकवण अंगीकारणे आवश्यक आहे. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। या त्यांच्या ओवीप्रमाणे भारताने आता दुहेरी शस्त्र उगारणे आवश्यक झाले आहे. भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी येनकेन प्रकारेण जे काही प्रयत्न चालवले जात आहेत, त्या विरोधात भारताला कणखर भूमिका बजावावी लागेल. भारतविरोधी अजेंडा पुढे रेटू पहाणार्यांशी दोन हात करावे लागतील. यासाठी कृष्णनीतीचा अवलंब करणे, हे ओघाने आलेच ! येणार्या काळात यशस्वी होण्यासाठी भारताला साहाय्य करणार्या भूमिकेसमवेतच कृष्णनीतीचे शस्त्रही वापरावे लागणार आहे. यातूनच भारत तावून सुलाखून बाहेर पडून हिंदु राष्ट्राची उज्ज्वल पहाट पाहू शकेल, हे लक्षात घ्या !