लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्करासाठी बैठकीत भाग घेतल्याचे सिद्ध करा ! – उच्च न्यायालयाचा आदेश
मालेगाव स्फोट प्रकरण
मुंबई – वर्ष २००८ मालेगाव (जिल्हा नाशिक) स्फोटाच्या संदर्भात अटक करण्यात आलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून येथील उच्च न्यायालयात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप काढून टाकण्यासाठी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यापूर्वीच्या झालेल्या सुनावणीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दावा केला होता की, २६ जानेवारी २००८ या दिवशी अभिनव भारत या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लष्करासाठी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी मी गेलो होतो. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या दाव्यावर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने प्रसाद पुरोहित यांना त्यांना लष्कराने गुप्त माहिती गोळा करण्यासाठी पाठवले असल्याचे सिद्ध करावे, असा आदेश ५ फेब्रुवारी या दिवशी दिला. या याचिकेवरील पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
उच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित यांना अभिनव भारतच्या बैठकीत सामील होण्यासाठी कुठल्या लष्करी अधिकार्यांनी सांगितले होते किंवा तशा प्रकारचे आदेश दिले होते का ?, असा प्रश्न विचारला होता; मात्र प्रसाद पुरोहित यांच्याद्वारे गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतःहून या बैठकीमध्ये भाग घेतला होता. यात मिळालेली माहिती ही त्यांच्या वरिष्ठांना देण्यात येत होती. त्यामुळे वरिष्ठांच्या कुठल्याही आदेशाविना कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या बैठकीत भाग घेतला असल्याचा दावा पुरोहित यांच्या विरोधी पक्षकाराकडून करण्यात आला होता; मात्र यावर न्यायालयाचे समाधान न झाल्यामुळे न्यायालयाने वरील आदेश दिला.