पौष आणि माघ या मासांतील (७.२.२०२१ ते १३.२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार शार्वरी नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. १२.२.२०२१ पासून माघ मास, शुक्ल पक्ष आणि शिशिरऋतू चालू होणार आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. षट्तिला (स्मार्त) एकादशी : पौष कृष्ण पक्षातील एकादशीला षट्तिला (स्मार्त) एकादशी म्हणतात. या दिवशी तिळाच्या तेलाने मसाज करून, तीळमिश्रित पाण्याने स्नान करतात. तिळाचे दान आणि हवन करून तीळमिश्रित प्रसाद भक्षण करतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. सूर्योदयाला जी एकादशी तिथी असते, तिला स्मार्त एकादशी म्हणतात. स्मृतींना पाळणारे स्मार्त एकादशी पाळतात.
२ आ. दग्ध योग : वार आणि तिथी यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ७.२.२०२१ या दिवशी रविवार असून उत्तररात्री ४.४८ नंतर द्वादशी तिथी आहे. ७.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.४८ पासून सूर्योदयापर्यंत दग्ध योग आहे.
२ इ. भागवत एकादशी : कधी कधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा सलग दोन एकादशी तिथी येतात. भागवत धर्म पाळणारे वारकरी भागवत एकादशी पाळतात. स्मार्त आणि भागवत या दोन एकादशी दोन स्वतंत्र दिवशी येतात. प्रत्येक मासाच्या प्रत्येक पक्षात अशा दोन एकादशी येतीलच, असे नाही.
२ ई. भौमप्रदोष व्रत : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला प्रदोष असे म्हणतात. मंगळवारी येणार्या प्रदोष तिथीला भौमप्रदोष म्हणतात. आर्थिक अडचणी नष्ट होण्यासाठी भौमप्रदोष हे व्रत करतात. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात.
२ उ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी विष्टी करण असते, त्या काळालाच भद्रा किंवा कल्याणी असे म्हणतात. ९.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.०६ पासून १०.२.२०२१ दुपारी १.३५ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऊ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे दर्श संज्ञक मानतात. बुधवार, १०.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०९ पासून ११.२.२०२१ या दिवशी रात्री १२.३६ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
२ ए. गुरु पूर्व दर्शन : १९.१.२०२१ पासून गुरु ग्रहाचा पश्चिमेस लोप झाला होता. ११.२.२०२१ या दिवशी गुरु पूर्व दर्शन होणार आहे. गुरु आणि शुक्र या ग्रहांचा अस्तंगत असतांना कोणती कार्ये करू नयेत ?, याविषयी लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
२ ऐ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन चंद्रकोर रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १३.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ८.११ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा,गोवा. (२५.१.२०२१)