राज्य राखीव पोलीस दल (बल) आणि तेथे चालणारे अपप्रकार !
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस
पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१. संरक्षणविषयक सुरक्षा दल म्हणजे काय ?
१ अ. राज्य राखीव पोलीस दल (एस्.आर्.पी.एफ्.) : एस्.आर्.पी.एफ्. म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, म्हणजे राज्य राखीव पोलीस दल. आमचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) जवळपास सैनिकांसारखेच झालेले असते. आमचे कामही (ड्युटी) सैनिकांप्रमाणेच असते; मात्र ती सुरक्षा सेवा (ड्युटी) केवळ शिबिर (कॅम्प) सुरक्षा करतांना करायची असते. सैनिक हा देशाच्या सीमेवर असतो, तसे राज्य राखीव पोलीस दल देशाच्या सीमेवर नसते, तर ते देशांतर्गत सुरक्षा करते. राज्य राखीव पोलीस दलावर राज्य सरकारचे नियंत्रण असते आणि त्यांना राज्य सरकारकडून वेतन दिले जाते. राज्य राखीव पोलीस दलामधील सर्वांना कामावर नियुक्त झाल्यापासूनच बंदूक (रायफल) दिली जाते. गडचिरोली आणि गोंदिया यांसारख्या नक्षलग्रस्त भागांमध्ये कामावर असलेल्या सर्वांकडे बंदूक असते.
१ आ. पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दल यांमधील भेद : जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांना बंदूक दिली जात नाही. त्यांना लाठी दिली जाते; म्हणून हे सर्व पोलीस लाठी पोलीस म्हणून ओळखले जातात.
१ इ. भारतीय राखीव तुकडी (बटालियन) (आय.आर्.बी.) म्हणजे काय ? : आय.आर्.बी. म्हणजे भारतीय राखीव तुकडी (इंडियन रिझर्व्ह बटालियन) यांचे प्रशिक्षण आणि काम राज्य राखीव पोलीस दल यांच्याप्रमाणेच असते; मात्र यांचे वेतन ७५ टक्के केंद्र सरकार आणि २५ टक्के राज्य सरकार देते. वेतनातील या विभागणीमुळे तिचे नाव भारतीय राखीव तुकडी असे केले आहे.
महाराष्ट्र्र राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या १३ तुकड्या आणि भारतीय राखीव तुकडी (बटालियन)च्या ३ तुकड्या अशा एकूण १६ तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षेसाठी नियुक्त केल्या आहेत.
२. राज्य राखीव पोलीस दलाची रचना
अ. राज्य राखीव पोलीस दलाच्या सर्वांत प्रमुख मुख्याधिकार्याला कमांडंट म्हणतात. हे जिल्ह्याच्या एस्.पी.प्रमाणे पद असते. त्या खालोखाल साहाय्यक अधिकार्याचे पद जिल्ह्याच्या डी.वाय.एस्.पी.प्रमाणे असते.
आ. कामाला अनुसरून यांच्या वेगवेगळ्या तुकड्या (कंपनी) असतात, उदा. अ तुकडी, ब तुकडी, क तुकडी इत्यादी. या तुकड्या सोडून गटामध्येच स्थानिक आणि प्रशासन नावाची तुकडी असते. स्थानिक तुकडी सुरक्षा सेवेसाठी (बंदोबस्तासाठी) बाहेर जात नाही. ती गटातीलच सुरक्षा आणि प्रशासन यांचे काम करते. बाकी अ, ब, क या तुकड्या कार्यरत असतात. त्या सतत आपापल्या पाळीनुसार सुरक्षा सेवेसाठी फिरतीवर असतात.
इ. प्रत्येक तुकडीवर नियंत्रण करण्यासाठी एक आय पोलीस निरीक्षक असतो. एका तुकडीमध्ये १ पी.आय. आणि ३ पी.एस्.आय. असतात. त्याच समवेत १२ ते १६ हवालदार, बाकी राहिलेले नाईक अन् पोलीस शिपाई असतात. अशी एकूण १२० लोकांची एक तुकडी असते.
ई. ज्या वेळी प्रत्यक्ष सुरक्षा सेवा असते, त्या वेळी या तुकड्या गट शिबिरांंमध्ये नसतात आणि ज्या तुकड्या गटांमध्ये असतात, त्यांना गट सुरक्षेची सेवा (ड्युटी) असते. ही सुरक्षा सेवा गटांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते. सुरक्षासेवकांची प्रत्येक २४ घंट्यांनी अदलाबदल केली जाते.
उ. गटांमध्ये एक तुकडी सतत राखीव असते. समजा, एखादी तुकडी तात्काळ पाचारण करायची असेल, तर या राखीव तुकडीला तेथे हलवता येते.
ऊ. इतर वेळी गटांमध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ अशी ३ वेळा उपस्थिती (हजेरी) घेतली जाते. कुणी कुठे बाहेर जाऊ नये आणि गेले, तरी २-३ घंट्यांतच परत यावे, यासाठी अशी उपस्थिती घेतली जाते.
ए. जिल्हा ग्रामीण पोलीस यांना गुन्हे आणि खटले यांची कामे असतात, तसे लिखाणाचे कसलेच काम राज्य राखीव पोलीस दल याच्याकडे नसते.
ऐ. प्रत्येक तुकडीच्या समवेत २ भोजनसेवक, एक मोची, एक धोबी, एक सफाई कामगार, असे चतुर्थ श्रेणी कर्मचारीसुद्धा असतात. प्रत्येक तुकडीच्या समवेत त्यांच्या जेवणासाठी भांडी, शेगड्या, गॅस आणि वेगवेगळे तंबू असतात. यामुळे प्रत्येक ठिकाणी जेवणाची सोय असते. राज्य राखीव पोलीस दल यांचे स्वतंत्र शिबिर (कॅम्प) असते. त्यांना रहाण्यासाठी घरे (क्वार्टर्स) दिली जातात.
ओ. आताच्या नियमानुसार १५ वर्षांनंतर राज्य राखीव पोलीस दलामधून जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस येथे बदलून जाता येते.
३. राज्य राखीव पोलीस दलाचे काम
अ. संपूर्ण राज्यामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बोलावली जाते, तसेच जेव्हा सरकारी मालमत्तेस हानी पोचवली जाते आणि जिल्हा अन् ग्रामीण पोलीस यांच्या आवाक्याबाहेर परिस्थिती जाते, त्या वेळीही निमलष्करी दल म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी पाचारण करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
आ. याच समवेत वेगवेगळ्या सणांसाठी सुरक्षा व्यवस्था असतात. मुंबईमध्ये साधारण वर्षामध्ये ४५ दिवसांसाठी सुरक्षेसाठी निश्चित ठिकाणे (फिक्सड पॉईंट्स) असतात. सुरक्षासेवेसाठी गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांतही ५ मासांंसाठी सुरक्षेसाठी निश्चित ठिकाणे असतात. नक्षलग्रस्त भागात २ वर्षांत ५ मासांसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या सुरक्षासेवकांना जावे लागते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– एक साधक (११.१०.२०१९)
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन पोलीस आणि प्रशासन कसे नसावे हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : socialchange.n@gmail.com |
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी वा अपकीर्ती करण्याचा उद्देश नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा व्हावी’, हा उद्देश आहे. – संपादक