काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले
नाना पटोले यांचे विधानसभा अध्यक्षपदाचे त्यागपत्र !
मुंबई – काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी ५ फेब्रुवारी या दिवशी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह राज्यात ६ कार्यकारी अध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक काढून याविषयीची माहिती दिली.
नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती शिंदे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना नाना पटोले यांनी काँग्रेसला प्रथम क्रमांकाचा पक्ष करणार असल्याची प्रतिक्रिया या वेळी दिली.
नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.