नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे साधक श्री. विजय (नाना) वर्तक यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सत्कार !
पनवेल – नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६६ टक्के पातळीचे साधक श्री. विजय (नाना) वर्तक (वय ७५ वर्षे) यांना नुकतेच ‘कोविड योद्धा’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्यांना शाल आणि श्रीफळ देण्यात आले. नागोठणे येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथे श्री संत सेवा मंडळ यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नागोठणे येथील कोरोनाच्या काळात परिश्रम घेतलेल्या अन्य १४ जणांचाही ‘कोव्हिड योद्धा’ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, समाजसेवक, वैद्य आदींचा समावेश होता. या वेळी ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज आणि सद्गुरु हरिश्चंद्र महाराज पाटील यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. संत सेवा मंडळाचे संस्थापक बाळासाहेब रावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ह.भ.प. दळवी गुरुजी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमही झाला. या वेळी मनसेचे रायगड जिल्हा समन्वयक गोवर्धन पोलसानी म्हणाले की, नाना वर्तक हे जीव तोडून हिंदु धर्माचे कार्य करत आहेत. गावात सर्वत्र ते प्रबोधनपर फलक लावतात. त्यांच्या कुटुंबियांनीही राष्ट्र-धर्मासाठी वाहून घेतले आहे.
नागोठणे येथील एक धर्माभिमानी, तसेच त्याचे वृद्ध आई-वडील कोरोना झाल्याने रुग्णालयात भरती होते. त्या वेळी त्यांच्या वडिलांना प्रतिदिन घेणे अत्यावश्यक असणारेे इन्सुलीनचे इंजेक्शन ते घरी विसरले होते. त्या धर्माभिमान्याने त्यांना संपर्क करून याविषयी सांगितल्यावर श्री. वर्तक जराही विचार न करता तत्परतेने त्यांच्या घरी गेले. ते इंजेक्शन शोधले आणि तत्परतेने त्यांनी रुग्णालयात ते जाऊन त्यांच्याकडे दिले. त्या वेळी कोरोना पुष्कळ अधिक प्रमाणात पसरलेला कालावधी होता. त्या धर्माभिमान्याच्या घरी सर्वांना कोरोना झाला होता, तरी ‘त्यांच्याकडे कसे जाऊ किंवा रुग्णालयात कसे जाऊ ?’ असा विचार जराही त्यांच्या मनात आला नाही. तसेच कोरोनाच्या काळात त्यांनी अन्य गरजूंनाही विविध प्रकारे साहाय्य केले. श्री. वर्तक यांची प.पू. डॉक्टर आणि देवावर पुष्कळ श्रद्धा असून ते त्यांचे रक्षण करणारच आहेत, असा दृढ विश्वास त्यांना आहे.