भारतीय पर्यटनाचा इतिहास !
भारताच्या प्राचीन इतिहासाची पाने उलटून पाहिली, तर लक्षात येते की, पर्यटन, तीर्थाटन आणि देशाटन यासाठी लोक प्रवास करत असत आणि त्याचा उपयोग कला-सौंदर्याचा विकास, ज्ञानार्जन अन् आध्यात्मिक उन्नती यांसाठी करण्यात येत असे, हे स्पष्ट कळून येते. इतिहासाचीही साक्ष आहे की, अरबस्तान आणि ग्रीस देशांत गणित, तत्त्वज्ञान अन् ज्योतिष इत्यादींचे अमूल्य ज्ञान तिथल्या पर्यटकांनीच इथून नेले होते. चीन देशाचे पर्यटक ह्येन सांग आणि फाहियान यांची कथा तर सर्वच जाणतात. त्यांनी भारतीय ज्ञान आणि संस्कृतीच्या अनेक मूल्यवान गोष्टी इथे ग्रहण केल्या अन् स्वत:च्या देशात जाऊन तेथील लोकांना त्यांनी ते ज्ञान दिले. अशाच प्रकारे भारताचे पर्यटक कुमारजीव, कौंडिण्य, बोधिधर्म यांनीही आपल्या आचरणाने, तपश्चर्येने आणि ज्ञानाने तेथील देशाच्या रहिवाशांना कृतार्थ केले. प्राचीन काळात हे जे घडले त्याचे पुनः मूल्यांकन करणे, त्यांचे नव्याने चलन चालू करणे, ही आजच्या काळाची सर्वांत मोठी आवश्यकता आहे.
(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योती’, सप्टेंबर २०१२)