सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरुदेवांच्या चरणी साधकांचे कृतज्ञतापुष्प !
‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने या घोर कलियुगामध्ये माझी गुरुमाऊलीची भेट झाली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझ्यासारख्या जिवाने गेल्या अनेक जन्मी जे काही पुण्य केले आहे, त्याचेच फलस्वरूप म्हणून गुरुमाऊलीची भेट झाली आहे. या जन्मी मी अध्यात्मवेडी होऊन श्री गुरूंच्या शोधात कुठेही गेले नव्हते. भगवंतानेच या जन्मामध्ये ही अनमोल भेट दिली आहे, यासाठी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवांंचे नाव जरी मनात आले, तरी ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता’, या शब्दाचे तरंग संपूर्ण शरिरात उमटतात. त्यांनी आतापर्यंत आम्हाला स्थुलातून आणि सूक्ष्मातून जे काही दिले आहे, ते सर्व शब्दातीत अन् अनमोल आहे. महर्षींनी ‘ते विष्णूचा अवतार आहेत’, असे आता सांगितले; परंतु त्यांच्याशी आमचा संपर्क आला, तेव्हापासूनच त्यांनी आम्हा सर्व साधकांना ते अवतार असल्याची प्रचीती दिली आहे.
मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्यानंतर लगेचच माझा गुरुमाऊलीशी संपर्क झाला. तेव्हापासून त्यांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण करते.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/448003.html |
८. ‘वाईट शक्तीही भुवलोकातून मुक्त व्हाव्या’ यासाठी त्यांनाही नामजप करण्यास सांगणारी परम कनवाळू परात्पर गुरुमाऊली !
८ अ. वाईट शक्तींच्या त्रासाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकवणे : ‘वाईट शक्ती देत असलेली माहिती, तसेच त्या करत असलेल्या कृती ही देवाने आपल्याला दिलेली अनमोल संपत्ती आहे. ती आपण जतन करून येणार्या पिढीसाठी ठेवायला हवी’, असे ते आम्हाला सांगून त्याचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवत असत. त्या समवेत ‘या सर्व प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसे पहायचे ?’, हेही ते आम्हाला वेळोवेळी सांगायचे.
८ आ. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येणे, खोलीमध्ये शुभ चिन्हे उमटणे इत्यादी माध्यमांतून देवाचे अस्तित्व अनुभवायला शिकवणे : वाईट शक्तींच्या त्रासामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येणे, खोलीमध्ये शुभ चिन्हे उमटणे, अशा प्रकारचे अस्तित्व देव आम्हाला दाखवत होता. त्या वेळी ‘वाईट शक्तींमुळे देव त्याचे अस्तित्व आपणाला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायला देत आहे’, असे सांगून ते ‘देवाविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, याची आम्हाला जाणीव करून देत होते. वाईट शक्तींचे त्रास नसते, तर देवाला त्याचे अस्तित्व वेगवेगळ्या अनुभूतींच्या माध्यमातून दाखवण्याची वेळ आली नसती. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना वाईट शक्तींविषयीही कृतज्ञता वाटायची. त्यामुळे आम्हालाही वाईट शक्ती त्रास देत असल्या, तरी त्याचे काही न वाटता आम्ही आनंदाने सर्व सेवा करू शकत होतो.
८ इ. ‘वाईट शक्तींचा त्रास होणे, ही वाईट गोष्ट आहे’, अशा दृष्टीकोनातून त्याकडे न पहाता ‘त्यातील प्रत्येक गोष्टीतून कसे शिकायला हवे ?’, हे परात्पर गुरुदेवांनी शिकवणे : ‘वाईट शक्तींचा त्रास होणे, ही वाईट गोष्ट आहे’, अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे न पहाता ‘त्यातील प्रत्येक गोष्टीतून कसे शिकायला हवे ?’, हे ते आम्हाला सांगत असत. ‘प्रत्येक प्रसंगातून देव आपल्याला काहीतरी देत असतो, ते घेण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत कसे रहायला हवे ?’, हे ते वेगवेगळे दृष्टीकोन देऊन आम्हाला शिकवत होते. प.पू. गुरुदेवांच्या सहवासात असतांना ‘शिकण्याच्या स्थितीत राहिल्यास आनंद कसा मिळतो ?’, हे आम्हाला अनुभवायला मिळायचे. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला, तरी आम्हाला त्याचे काही वाटायचे नाही; कारण ‘देव आहेच आणि तोच सर्व करणार आहे’, याची मनात निश्चिती होती.
८ ई. वाईट शक्तींनीही ‘भुवलोकातून मुक्त व्हावे’, यासाठी त्यांना नामजप करण्यास सांगणे : वाईट शक्ती साधकांना पुष्कळ त्रास द्यायच्या. असे असूनही ‘वाईट शक्तींनीही भुवलोकातून मुक्त व्हावे’, असे गुरुदेवांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी आम्हाला वाईट शक्तींना नामजप करायला सांगण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही त्यांना नामजपाची माहिती सांगत होतो. त्यातील काही वाईट शक्तींनी नामजप करायला आरंभही केला होता. यातून ‘प्रत्येक जिवाचा उद्धार व्हावा’, ही गुरुदेवांमधील अमर्याद प्रीती आम्हाला अनुभवायला मिळाली. अशी तळमळ केवळ अवतारांमध्येच असू शकते.
९. वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसाठी अविश्रांतपणे रात्रंदिवस नामजपादी उपाय करणे
गुरुदेवांनी वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आजपर्यंत पुष्कळ कष्ट घेतले आहेत. गुरुदेव हा लढा वर्ष २००३ पासून आजपर्यंत लढत आहेत.
अ. ‘वाईट शक्तींचा त्रास लवकर अल्प व्हावा आणि साधकांना बरे वाटावे’, यासाठी गुरुदेवांनी अनेकदा दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत साधकांसाठी नामजपादी उपाय केले होते.
आ. अनेकदा साधकांसाठी पूर्ण दिवस आणि रात्रभर न झोपताही नामजपादी उपाय केले होते. यामध्ये मोठ्या वाईट शक्ती साधकांना दिवसभर त्रास द्यायच्या आणि रात्री त्रासदायक शक्ती मिळवून पुन्हा साधकांना त्रास द्यायच्या. त्यांची शक्ती पुष्कळ प्रमाणात आणि एकाच वेळी नष्ट करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी एकदा एक पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र साधकांवर उपाय केले होते. त्यानंतर सकाळी न झोपता त्यांनी पुन्हा अन्य सेवा केली होती.
‘उपाय करतांना साधकांना त्रास होऊ नये’, या दृष्टीने ते साधकांची पुष्कळ काळजी घेत असत. उपायानंतर थकवा येतो; म्हणून त्यांना विश्रांती घेण्यास सांगत होते; परंतु स्वतः मात्र अखंड उपाय आणि त्यानंतर अन्य सेवा अशी त्यांची व्यस्त दिनचर्या असायची.
१०. वाईट शक्तींवर उपचार करणार्या विविध ठिकाणच्या जाणकारांनी सांगितलेले उपाय करून उपायांची परिणामकारकता अभ्यासणे
समाजामध्ये वाईट शक्तींवर उपचार करणारे अनेक जाणकार लोक आहेत. ते आश्रमामध्ये येऊन साधकांचे त्रास न्यून करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करायला सांगत असत. गुरुदेव सर्व उपाय करायला सांगायचे. यातून त्यांनी ‘प्रत्येक उपायपद्धतीची परिणामकारकता किती आहे आणि ती किती काळ टिकते’, याचा अभ्यास केला. खरेतर ते अवतार असल्यामुळे त्यांना उपाय करण्याच्या पूर्वीच हा भाग माहीत होता, तरीही त्यांनी संबंधित उपचार करणार्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी करून घेतले. तसेच सर्व त्रासांवर सतत कठोर साधना करून वाईट शक्तींची शक्ती अल्प करणे, तसेच ‘काळ-महिम्यामुळे त्रास अल्प होण्यास कालावधी लागणार’, हा भाग सिद्ध करून दाखवला.
११. प्रीतीस्वरूप गुरुमाऊली
११ अ. चुका सांगून अंतर्मुख करणे आणि तेवढेच प्रेमही करून आत्मविश्वास वाढवणे : वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करणे, त्याचे चित्रीकरण करणे आणि वाईट शक्ती जे काही बोलतील किंवा माहिती देतील, ती माहिती लिहून घेणे, अशा अनेक सेवा एकाच वेळी कराव्या लागत होत्या. आम्ही सर्वचजण नवीन असल्यामुळे आणि आम्हा साधकांची क्षमताही अल्प असल्यामुळे या सर्वच सेवांमध्ये आमच्याकडून असंख्य आणि त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होत होत्या. या चुकांमुळे आमची साधनेमध्ये हानी होत होती. ‘आमच्या साधनेची हानी टळावी’, यासाठी गुरुमाऊली आमच्याकडून चुका झाल्यानंतर आम्हाला कठोर शब्दांत आमच्या चुका सांगत होती; परंतु त्याचसमवेत ‘आम्ही निराशेमध्ये जायला नको’, याचीही ती काळजीही घेत असे. आम्हाला चुका सांगून अंतर्मुख करत आणि नंतर प्रेम देऊन आत्मविश्वास वाढवत. त्यामुळे चुका झाल्या, तरी आम्ही पुन्हा नव्या जोमाने पुढील सेवा करत होतो.
११ आ. साधकांसाठी काजूगर आणणे : गोवा येथे काजूगर अधिक प्रमाणात मिळतात; परंतु सांगली-मिरज या ठिकाणी काजूगर मिळत नाहीत. एकदा गुरुदेवांनी आश्रमातील साधकांना खाण्यासाठी काजूगर आणले होते. स्वयंपाकघरातील साधिकेने न विचारताच त्याची भाजी केली. त्या वेळी गुरुदेवांनी त्या साधिकेला सांगितले, ‘‘इकडील भागामध्ये काजूगर मिळत नसल्यामुळे त्याची भाजी न करता ते तसेच सर्वांना खायला द्यायला हवे होते. कोकण भागात हे अधिक प्रमाणात मिळत असल्यामुळे तेथे भाजी करणे योग्य आहे.’’ तेव्हा ‘गुरुदेवांचा किती व्यापक दृष्टीकोन आहे आणि साधकांचा ते किती विचार करतात ?’, हे शिकायला मिळाले. हे सूत्र त्यांनी सत्संगातही सांगायला सांगितले.
१२. क्षमतेने आंधळ्या लुळ्या पांगळ्या असणार्या साधकांकडून सूक्ष्म विभागाची घडी बसवून घेणारे थोर गुरुदेव !
या विभागाच्या अंतर्गत सेवा करणारे आम्ही सर्व साधक ‘आम्हाला काहीच येत नाही’, असे होतो, तरीही त्या सेवांच्या दृष्टीने आंधळ्या, लुळ्या आणि पांगळ्या साधकांना समवेत घेऊन त्यांनी सूक्ष्म विभागाची घडी बसवली. ‘आमची अपूर्णता आणि आम्हाला त्यांनी कसे समजून घेतले ?’, हे शब्दांत सांगणे अशक्य आहे.
१३. वाईट शक्तींविषयीचे सर्व ज्ञान आधुनिक परिभाषेमध्ये संशोधनासह जगासमोर मांडणे
वर्ष १९९० पासून गुरुदेव वाईट शक्तींचा अभ्यास करत आहेत. अजूनही त्यांचा अभ्यास आणि त्यावरील संशोधन चालूच आहे. यामध्ये त्यांनी केवळ ‘वाईट शक्ती म्हणजे काय ? त्यांचे प्रकार आणि उपचारपद्धती’ एवढेच ढोबळमानाने मांडले नसून यातील प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला आहे अन् अजूनही तो अभ्यास चालू आहे. इतिहासामध्ये अशा पद्धतीने सखोल अभ्यास आजपर्यंत कुणीच केला नसेल. अशा गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०१८)
(समाप्त)
|