कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !
कोरोना महामारीच्या काळात आनंदाने बाजारसाहित्याची सेवा करणारे आणि देवावरील श्रद्धेमुळे देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील (वय ५१ वर्षे) !
१. कोरोना महामारीच्या काळात परात्पर गुरुदेवांनी करून घेतलेली स्वतःची आणि पत्नीच्या मनाची सिद्धता !
१ अ. कोरोना महामारीच्या काळात बाजारसाहित्याची सेवा करतांना भीती वाटणे आणि ‘कोरोनापेक्षा देव मोठा आहे’, या विचाराने भीती जाऊन आनंदाने सेवा होऊ लागणे : ‘कोरोना महामारी चालू झाल्यापासून बाजारसाहित्याची सेवा करतांना आरंभी मला थोडीफार भीती वाटायची. ‘सेवा कशी काय होणार ?’, असे काळजीचे विचार यायचे; पण सेवा चालू होती. काही दिवसांनी अकस्मात् माझ्या मनात विचार आला, ‘कोरोना मोठा कि देव मोठा ?’ या विचाराने मनातील भीती निघून गेली. ‘मला काही व्हायचेच असेल, तर मी कुठेही असलो, तरी होणारच आहे. मग घाबरायचे कशाला ?’, असा विचार देवाने दिला आणि सेवा आनंदाने होऊ लागली. कोरानामुळे जग घाबरले होते; पण मला त्याचा लाभच झाला.
१ आ. ‘साधकांना साहित्य कसे मिळेल’, याची तळमळ लागणे आणि यांतूनच कुटुंबभावना, प्रेमभाव आणि समष्टी तळमळ वाढीस लागणे : आश्रमातील आजारी आणि वयस्कर साधकांनी काही साहित्य आणायला सांगितले, तर मला त्यांना ‘नाही’ म्हणायला होत नसे. ‘त्यांची गैरसोय व्हायला नको’, असे वाटायचे. एखाद्या साधकाला ‘नाही’ म्हटले, तर मला रात्री झोप लागायची नाही. ‘माझे हे कुटुंब आहे. त्यांचे दायित्व पार पाडणे’, ही माझी साधना आहे’, असा विचार मनात यायचा. ‘साधकांना साहित्य कसे मिळेल ?’, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत होतो. यातून इतरांविषयी प्रेमभाव, कुटुंबभावना आणि समष्टी सेवेविषयी तळमळ वाढत होती. हे सर्व पालट देवाच्या कृपेने माझ्यात आपोआप होत गेले.
१ इ. सर्व देवाची इच्छा म्हणून स्वीकारल्याने घरी येण्याविषयी पत्नीला काही न वाटणे आणि तिच्या मनाची सिद्धता होणे : पूर्वी एक मासानंतर सेवेची तडजोड करून मी घरी जायचो; पण आता ५ मास झाले, तरी मी घरी गेलो नाही. घरी न गेल्यामुळे पत्नीला आणि मला काही वाटत नव्हते. मी पत्नीला सांगायचो, ‘‘सर्वकाही देवाची इच्छा आहे. देवाला अपेक्षित असे होईल. आपण एकमेकांमध्ये न अडकता मायेपासून मुक्त व्हायचे आहे. देव आपल्याला त्याच्या जवळ येण्यासाठी ही संधी देत आहे.’’ पूर्वी पत्नीला ‘१ मास झाला, तरी आले नाहीत’, असे वाटायचे. आता ५ मास होऊनही घरी गेलो नाही, तरी पत्नीला ‘मी घरी यावे’, असे वाटत नाही. त्या दृष्टीने तिच्या मनाची सिद्धता झाली आहे.
१ ई. गणेशोत्सवाला घरी गेल्यास अलगीकरणात अनेक दिवस वाया जाणार असल्याने पत्नीने आश्रमातच रहाण्यास सांगणे आणि कोणतीही काळजी वाटत नसल्याने गुरूंनीच याद्वारे मनाची सिद्धता करून घेतल्याचे जाणवणे : गणेशोत्सवाला घरी येण्याच्या संदर्भात बोलतांना मी पत्नीला म्हटले, ‘‘देवाच्या नियोजनानुसार सर्व होईल.’’ तिच्या बोलण्यातून ‘मी घरी यावे’, असा विचार अथवा अपेक्षा नव्हती. मी तिला सांगितले, ‘‘गणेशोत्सवाच्या कालावधीत घरी गेलो, तर घरी १४ दिवस अलगीकरण (क्वारंटाईन) आणि परत इकडे आश्रमात आल्यानंतर १४ दिवस बाहेर अलगीकरण (क्वारंटाईन) करून रहावे लागेल.’’ त्या वेळी तिचा विचार झाला की, मग तुमचे दिवस वाया जातील. त्यापेक्षा तुम्ही तिकडे आश्रमातच थांबा. २० वर्षांत पहिल्यांदाच आम्ही ५ ते ६ मास दूर राहिलो, तरी ‘मायेचे विचार, ‘घरी गेले पाहिजे’, असे वाटणे, प्रकृतीची काळजी वाटणे, घरी कसे होईल ?’, याची काळजी किंवा चिंता मला वाटत नव्हती. यातून मला शिकायला मिळाले की, गुरूंनी माझ्या मनाची सिद्धता करून माझी श्रद्धा आणि भक्ती वाढवण्यासाठी हा प्रसंग घडवला आहे.
१ उ. ‘आपत्कालीन स्थितीत घराचे रक्षण कसे करायचे ?’, हा ‘दैनिक सनातन प्रभात’मधील लेख वाचून घराच्या पत्र्यांवर वाळूची पोती ठेवण्यास सांगणे; गुरुआज्ञा म्हणून मुलाने तशी कृती करणे आणि यापुढे ‘गुरुच घराची काळजी घेतील’, असे पत्नी आणि मुलाला सांगणे : २३.७.२०२० या दिवशी दैनिकात ‘आपत्कालीन स्थितीमध्ये घराचे रक्षण कसे करायचे ?’, हे गुरुदेवांनी दैनिकात सांगितले होते. ते वाचून मी घरावरचे पत्रे वारा आल्यावर उडू नयेत; म्हणून पत्र्यावर वाळूचे पोते ठेवायला सांगितले. माझा छोटा मुलगा ओम ते ठेवण्यास टाळाटाळ करत होता. त्याला सांगितले, ‘‘गुरुआज्ञा म्हणून करायचे आहे. किती ठेवले आहेस, याला महत्त्व नाही. तू आईचे साहाय्य घेऊन कर.’’ त्यानंतर त्याने स्वतः जाऊन वाळूची २ ते ४ पोती आणली आणि ती पत्र्यांवर ठेवली. त्याने केलेली कृती पाहून मला पुष्कळ भरून आले. ते दोघे मला म्हणाले, ‘‘वार्याचे प्रमाण पुष्कळ आहे. वार्याच्या तुलनेत आपण जी वाळूची पोती ठेवली आहेत, ती अल्प आहेत. पत्रे उडून जाण्याची शक्यता आहे.’’ त्या वेळी मी त्यांना म्हटले, ‘‘आपण ते गुरुआज्ञा म्हणून केले आहे. आता पुढे घराचे काय होईल, ते होऊ द्या. गुरु काळजी घेतील. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण केवळ आज्ञापालन केले आहे.’’
१ ऊ. आश्रमात अधिक मास राहूनही घरी आवश्यक वस्तू कुटुंबियांनी आणणे आणि घरची काळजी न वाटणे : आधी मी काही दिवसांनी घरी जायचो. तेव्हा त्यांना घरात आवश्यक त्या वस्तू आणून ठेवायचो. आता आश्रमात अधिक मास राहिल्यामुळे मला काही करता आले नाही; पण तिकडे काही गोष्टी आपोआप झाल्या. मला काही काळजी करण्यासारखे राहिले नाही. मी त्यांना सहज कोरोनाच्या सूचना सांगून ‘आवश्यक वस्तू घरी आणून ठेवा’, असे सांगितल्यावर ते सहजतेने ऐकून कृती करायचे. त्या वेळी मला त्यांची कसलीच काळजी, चिंता नसायची.
१ ए. सेवेचे महत्त्व लक्षात येणे : जुलै २०२० च्या शेवटच्या आठवड्यात पायाला दुखापत झाल्याने मला एका खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले होते. मला सेवा करता येत नसल्यामुळे करमत नव्हते. मनात सेवेचे विचार यायचे. १५ दिवसांनी सेवा चालू केली, त्या वेळी समजले की, सेवेत नसल्यास मनाची स्थिती काय होते. ते अनुभवता आले आणि ‘सेवेचे काय महत्त्व आहे’, ते लक्षात आले.
२. अलीकडे जाणवलेले पालट
२ अ. झोपेचे प्रमाण अल्प होऊन विश्रांतीची आवश्यकता न वाटणे : दोन मासांपासून माझ्या झोपेचे प्रमाण अल्प झाले आहे. झोपेतून मध्ये मध्ये जाग येते. जाग आल्यावर नामजप करत बसतो. परत झोप आल्यावर झोपतो. या दिवसांमध्ये दुपारचीही विश्रांती अल्प झाली आहे. पूर्वी दुपारी विश्रांतीची आवश्यकता वाटायची.
२ आ. स्वप्नात चुकांची जाणीव होणे आणि संतांनी या प्रयत्नांचे कौतुक करणे : दोन मासांपासून माझ्यात झालेला पालट म्हणजे स्वप्नात काही प्रसंग घडायचे. त्या वेळी मी कुणाला तरी रागाने बोलायचो किंवा चिडायचो. त्या क्षणी ‘आपण असे कसे चुकीचे बोललो ?’, याची मला जाणीव व्हायची. हे सर्व एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘बघा, बर्याच जणांना प्रसंग घडतांनाही चुका लक्षात येत नाहीत, तर यांना स्वप्नातही यांच्या चुका लक्षात येतात आणि ते प्रयत्न करतात. आपले प्रयत्न असे असायला हवेत.’’
३. सनातन संस्थेत आल्यावर देवानेच योगक्षेम वाहिल्याची आलेली अनुभूती
३ अ. सनातन संस्थेत आल्यामुळे चांगला माणूस बनणे : मी सनातन संस्थेमध्ये येण्यापूर्वी माझ्यात चांगले मानवी गुण किंवा तत्त्वनिष्ठा नव्हती. मी जगत असलेल्या जीवनाला काहीच अर्थ नव्हता. सनातन संस्थेत आल्यानंतर मला कळले की, माणूस होण्यासाठी आणि चांगले व्यक्तिमत्त्व असण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आता मी सांगू शकतो की, सनातन संस्थेत आल्यापासून मी एक चांगला माणूस झालो आहे.
३ आ. सर्व कुटुंबाचा भार देवानेच वहाणे : मी पूर्णवेळ होऊन २० वर्षे झाली. या २० वर्षांच्या कालावधीत मुलांचे संगोपन, शिक्षण, आजारपण, घराचे बांधकाम इत्यादी सर्वकाही देवाच्या कृपेने पूर्ण झाले. त्यात काहीच आर्थिक अडचण आली नाही. बाकीचे लोक पैसे कमावतात. मी काही कमवत नाही. पत्नीला पुष्कळ सुखाची अपेक्षा नाही. आम्ही घरात चर्चा करतो की, आपले सर्व देवाच्या कृपेने कसे चालले आहे. आमचे सर्व देवाच्या भरवशावर आहे.
४. साधकांना माझे वय १० – १५ वर्षे अल्प वाटणे
एका संतांच्या भेटीमध्ये कुटुंबाची माहिती सांगतांना मी सांगितले, ‘‘मुलगा बीकॉम शिकतो.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुझे वय काय ?’’ मी म्हणालो, ‘‘५१ वर्षे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘समोर ये.’’ त्यांनी मला सर्वांसमोर उभे रहाण्यास सांगून समोरच्या साधकांना विचारले, ‘‘तुम्हाला काय वाटते की, याचे वय किती असेल ?’’ काही साधकांनी सांगितले, ‘‘३५ ते ४० वर्षे ! ते मला म्हणाले, ‘‘छायाचित्र काढून ठेवा. ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये छायाचित्र छापून वय किती आहे, हे ओळखा ?’, असा प्रयोग करूया.’’
५. कृतज्ञता
‘या कोरोना महामारीच्या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले आणि गुरूंवरची श्रद्धा वाढवली. मनातील कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून आमच्या मनाची सिद्धता करवून घेतली. ‘जी परिस्थिती आहे, ती अजून चांगल्या तर्हेने आणि आनंदाने कशी स्वीकारायची’, हे देवाने शिकवले. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. परशुराम पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |