पनवेलच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणार्या छोट्या राजनच्या हस्तकाला पुणे येथून अटक
पुणे – पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या ‘युनिट १’ने कोंढव्यातून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर असे हस्तकाचे नाव असून गेल्या ६ वर्षांपासून तो पसार होता. त्याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कह्यात देण्यात आले आहे. पसार झाल्यानंतर तो कोंढव्यातील टिळेकर नगर परिसरात रहात होता. त्याच्यावर एकूण २९ गुन्हे नोंद आहेत.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये ठक्कर, छोटा राजन, सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमित म्हात्रे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयाने २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती; पण ठक्कर हा गुन्हा घडल्यापासून पसार होता.