‘हा निवळ अपर्कीतीचा हेतू, काही तथ्य नाही !’ – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचे प्रकरण
मुंबई – करुणा शर्मा यांनी त्यांच्या मुलांविषयी केलेले आरोप निवळ अपर्कीती करण्याच्या हेतूने करण्यात आले असून यात काहीच तथ्य नाही, असे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर मुंडे यांनी खुलासा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे यांनी खुलाशात पुढे म्हटले आहे की, करुणा शर्मा यांच्यासमवेत असलेल्या विवादासंदर्भात मी स्वतः उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. मुळात जे सूत्र मध्यस्थीमध्ये चर्चेत आहे, त्याविषयी जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसल्याचे स्पष्ट होत आहे. निवळ ‘मीडिया ट्रायल’ चालवून अपर्कीती करणे हाच हेतू यात दिसून येत आहे. या विवादावर सहमतीने तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नियुक्त करण्याची विनंतीही केली. त्यानंतर न्यायालयाने मेडिएटरची नियुक्ती केलेली आहे.
उच्च न्यायालयाने चेन्नई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मध्यस्थी म्हणून नियुक्तीही केली आहे. या मध्यस्थीच्या आतापर्यंत २ बैठका झालेल्या असून येत्या १३ फेब्रुवारी या दिवशी पुढील बैठक होईल. या मध्यस्थीमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व सूत्रांवर चर्चा होऊन निर्णय येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकार्यांसमोर मध्यस्थीची प्रक्रिया चालू असतांना अशा प्रकारे मुलांच्या कह्यात घेण्यावरून तक्रार करणे म्हणजे हेतूविषयी शंका निर्माण करणारे आहे. न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे.