राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

डावीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गोपीचंद पडळकर

सांगली – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू, अशी चेतावणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. ते झरे येथे बोलत होते. (१ वर्ष जर पुतळा अनावरण न होता, तसाच रहात असेल, तर पुतळा ज्या कारणासाठी बांधले त्याचा उद्देश सफल होत आहे का ? त्यामुळे शासनाने यात तातडीने लक्ष घालून पुतळ्याचे अनावरण कसे होईल ते पाहिले पाहिजे ! – संपादक)

आमदार पडळकर पुढे म्हणाले,  ‘‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे एक मंदिर आहे आणि या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यामुळे या मंदिराच्या वतीने प्रवेशद्वारावर अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय झाला. गेल्या १ वर्षापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. मी हिंगोली दौर्‍याच्या कालावधीत तेथे गेलो असता माझ्या ते निदर्शनास आले. सध्या हा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आहे.

या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी स्थानिक आमदारांची भावना असल्याने याचे अनावरण अद्याप होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यास आमचा विरोध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याच्या अनावरणाविषयी ठोस भूमिका घ्यावी; अन्यथा तमाम धनगर समाज एकत्र येऊन होळकरांचे वारसा असणारे भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करतील.’’