एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

मुंबई – एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

राज्य आतंकवादविरोधी पथकाने ३० जानेवारी या दिवशी न्यायालयाच्या आदेशाने पठाणचा ताबा घेत त्याच्याकडे चौकशी केली. राज्य आतंकवादविरोधी विभागाकडे नोंद असलेल्या गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी राज्य आतंकवादविरोधी पथक अधिक अन्वेषण करत आहे.

राज्य आतंकवादविरोधी पथकाने एम्.डी. तस्करी प्रकरणात नोंद गुन्ह्यात सोहेल सागीरअली सैय्यद (वय ३४ वर्षे) आणि झिशान आरिफ मेमन (वय ३२ वर्षे) यांना अटक केली होती. याच गुन्ह्यात पठाण हा आरोपी होता. नारर्कोटिक्स नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.) डोंगरीतील एम्.डी. हा नशायुक्त पदार्थ सिद्ध करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत पठाणला घणसोली येथून अटक केली होती. मागील ५ वर्षांत त्याच्या हस्तकांनी १ सहस्र ५०० कोटींचे अमली पदार्थ विकले आहेत. त्यात पठाणच्या नोंदवहीतूनही अनेक वलयांकित व्यक्ती आणि उद्योजक मंडळींची नावे एन्.सी.बी.च्या हाती लागली आहेत.

पठाण याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने त्याला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे चिंकू पठाणची प्रकृती खालावल्याने त्याला जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे उपचाराअंती त्याला सोडण्यात येताच राज्य आतंकवादविरोधी पथकाने पठाणला कह्यात घेतले.