नैसर्गिक मध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता !
१. शुद्ध मधातील भेसळ पडताळण्यासाठीच्या तपासण्या
१ अ. भेसळ ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान : मध आणि अन्नपदार्थ यांतील भेसळ हा विषय भारतापुरता मर्यादित नसून तो सर्व राष्ट्रांसाठीही महत्त्वाचा आहे. पूर्वी सामान्य निकष होते. त्याविषयीचा शास्त्रीय अभ्यास वाढल्यावर निकषही वाढत गेले. ‘सुक्रोज ग्लुकोज रेशो’ इथपासून ते सी ४, सी ३, सी १३, सी १२ कार्बन टेस्टींग, एल्सी-आयआरएमएस (लिक्विड क्रोमॅटोग्राफी) आयसोटॉप या यंत्रावर तपासण्या चालू झाल्या. एस्.एम्.आर्. (स्पेसिफिक मार्कर फॉर राईस सिरप) ‘लिक्विड क्रोमॅटोेग्राफी-मास स्प्रेक्ट्रोमेटरी फॉर कॉम्प्लेक्स’ आदी विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते. आता भेसळ ओळखण्यासाठी टी.एम्.आर्. (ट्रेस मार्क फॉर राईस सिरप) एन्.एम्.आर्. तपासणी (न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिसॉन्स मॉलेक्युलर स्ट्रक्चर) यांचा उपयोग केला जातो.
१ आ. मधाविषयीच्या तपासण्या जर्मन प्रयोगशाळेत होतात. त्यांच्या शाखा अमेरिकेत २२, युरोप २५, मध्य पूर्व ७, आफ्रिका १७, एशिया पॅसेफिक ५, भारत १३ (त्यातील ७ महाराष्ट्रात) आहेत. मधाच्या नमुन्याच्या आंतरराष्ट्रीय तपासणीसाठी लागणारा व्यय कराव्यतिरिक्त १ लाख २५ सहस्र रुपये आहे.
१ इ. मधाविषयीची माहिती
१. प्रत्येक वेळी मध गोड असतोच असे नाही.
२. मधाची चव आणि रंग पालटत असतो.
३. गरम किंवा उष्ण प्रदेशात मध पातळ असतो.
४. थंड प्रदेशात मध जाड असतो.
५. मध शीतकपाटात ठेवल्यास अधिक जमतो, ‘क्रिस्टलायझेशन’ होऊ शकते. तो सेवन करणे अधिक हानीकारक नाही.
६. नैसर्गिक नावडता वास येऊ शकतो.
७. नैसर्गिक मधाला मेण आणि पोलन यांचा थर बाटलीवर जमा होऊ शकतो.
२. भारतातील पोषक वातावरण
भारत आणि इतर देश यांच्यातील वातावरण अन् चलन यांत पुष्कळ तफावत आहे. युरोपीय आणि भारतीय निकष वेगवेगळे असायला हवेत. भारत हा ट्रॉपिकल कंट्री (उष्णकंटीबंधीय देश) म्हणून ओळखला जातो. भारतात सर्व प्रकारचे वातावरण आहे. जगातील सर्व प्रकारची फुले, फळे, वनस्पती भारतातच उगवतात. भारतात विविध प्रकारची फुले, झाडांमधून वाहणारे स्राव, जंगली आणि पाळीव मधमाशा आहेत. जांभूळ, नीलगिरी, तूर, मोहरी, ओवा, लिची, बोर, बाभूळ, सूर्यफूल, करंज, शिसम, जांटी, कापूस, कडीपत्ता, मल्टीफ्लोरा, रबर, बडीशेप, खारफुटीची झाडे यांमुळे अनेक मध आहेत. मधाला रंग, गोड, तुरट चव आणि गंध आहेत.
३. सरकारची भूमिका
मध पाळणे, गोळा आणि बांधणी करणे हे विषय निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाचे वाढते तापमान, अवेळी पडणारा पाऊस यांनाही तोंड द्यावे लागते. यासाठी विमा नाही. काश्मीर, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात या राज्यांत मधमाशी पालन केले जाते. योग्य वेळी प्रशिक्षण, विमा आणि उत्पादन वाढवण्यासाठी कार्यक्रम, तसेच पॉलिनेशन (परागकण) करण्यासाठी सरकारी प्रोत्साहन आवश्यक आहे. जोडधंद्यांविषयी सरकारने विचार करावा. त्यामुळे मधाला स्थिर भाव मिळून योग्य दर्जाचा मध मोठ्या प्रमाणात मिळेल.
अ. थंडीत मोहरी असलेला मध भारतातून निर्यात केला जातो. तो मध भारतियांनी खाण्यास प्रारंभ केल्यास भेसळीचे प्रमाण थांबवले जाऊ शकते.
आ. मधामध्ये मधमाशी पालक, बांधणी करणारे, व्यापारी यांची साखळी आहे. मध तपासणी जिल्हा किंवा तालुका पातळीवर उपलब्ध झाली, तर प्रमाणपत्रासह योग्य माल ग्राहकांपर्यंत पोचून ग्राहकाला योग्य मूल्य मिळू शकते. मधमाशीपालन हे ग्रामोद्योगामध्ये मोडत असल्यामुळे रोजगारही उपलब्ध होऊ शकतो.
४. सरकारने आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व !
गेल्या काही वर्षांमध्ये एफ्.एस्.एस्.ए.आय. (भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण) आणि एफ्.डी.ए. (अन्न आणि औषध प्रशासन) यांच्या कार्यपद्धतीत पालट करून कठोर अन्न कायदे आणले जात आहेत. आंतरराष्ट्रीय तपासणीकडे त्यांचा कल आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी, ग्रामोद्योग, मोठ्या आस्थापनांचा समन्वय साधणे हे मोठे दायित्व सरकारवर आहे. सरकारने वाजवी दरात तपासण्या उपलब्ध करून दिल्यास मधमाशी पालक, व्यापारी आणि बांधणी करणारे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवू शकतात. मधातील भेसळ थांबवण्यासाठी आणि तपासण्यासाठी वाजवी दरात प्रयोगशाळा, मधमाशी पालनासाठी विमा, अर्थसाहाय्य, ट्रेडिंग, मधासाठीच्या फुलशेतीची माहिती, मधमाशी पालन वाढवण्यासाठी औषधे भारतात निर्माण झाली, तर योग्य दरात चांगला अन् नैसर्गिक मध ग्राहकांना चाखायला मिळेल.
५. फोंडाघाट फार्मसी
गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून ‘फोंडाघाट फार्मसी’ मधाच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही फार्मसी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांतून जंगली आणि मधपालन केलेले उत्पादन गोळा करते. त्यामुळे मधपालक आणि व्यावसायिक यांच्यात थेट संपर्क आहे. गेल्या काही वर्षांपासून फोंडाघाट फार्मसी मध खरेदी करतांना ते जर्मनीमध्ये तपासण्यासाठी पाठवत आहे, तर काही तपासण्या ‘एन्एबीएल् अॅप्रूव्हड लॅब’, ‘अॅगमार्क अॅप्रूव्हड लॅब’ येथून करून घेतात.
भारतात ‘जीएमपी’, ‘एफ्एस्एस्एआय’, ‘अॅगमार्क’, ‘आयएस्ओ’, ‘हलाल सर्टिफिकेशन’ आहेत, तसेच ‘अॅगमार्क’ आणि ‘एफ्एस्एस्एआय’ वेळोवेळी बाजारातून मधाची तपासणी करतात.
(संदर्भ : ‘चित्रलेखा’, ४ जानेवारी २०२१)