‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य, त्यांची शिकवण आदींविषयी अमेरिका येथील श्री. सारंग ओझरकर यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य, त्यांची शिकवण आणि ५.७.२०२० या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे झालेले दर्शन’ आदींविषयी अमेरिका येथील श्री. सारंग ओझरकर यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !
हितचिंतक श्री. सारंग ओझरकर यांचा परिचय‘पुणे येथील साधिका सौ. नीलांबरी ओझरकर यांचा मुलगा श्री. सारंग ओझरकर हे अमेरिका येथे वास्तव्याला आहेत. ते मागील २ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नामजप आणि अन्य उपाय करत आहेत. ते अर्पणाच्या माध्यमातून संस्थेच्या धर्मकार्यात सहभागी होतात. दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेले ‘ऑनलाईन’ सत्संग ते नियमितपणे पहात आहेत. प्रत्येक शनिवारी संगणकीय प्रणालीद्वारे वाचकांसाठी असणार्या सत्संगाला ते नियमितपणे जोडलेले असतात. ते सत्संगात सांगितलेल्या कृती मनापासून करतात. त्यामुळे ‘काय लाभ झाला ? काय अनुभवले ?’, हे ते प्रत्येक सत्संगात सांगतात. ५.७.२०२० या दिवशी झालेला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पाहिल्यानंतर त्यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. |
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक ग्रंथ आणि सत्संग यांद्वारे यांनी ‘अंघोळ कशी करावी ? दैनंदिन आचार कसे ठेवावेत ?, यांपासून ते उत्तम जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व ज्ञान उपलब्ध करून दिले. यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमांतून (ग्रंथ, लेख, ‘यू ट्यूब’ वरील ध्वनीचित्र-चकत्या आणि संस्थेचे विविध उपक्रम) परात्पर गुरु डॉक्टरांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टर ‘सनातन संस्था’ स्थापन करून आणि सर्वांना संघटित करून सर्वांचे नेतृत्व करत आहेत.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन
२ अ. ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे गुण न्याहाळण्याची संधी मिळणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक लहान गोष्टींमधून मला एवढे ज्ञान मिळवून दिले की, माझ्या तोंडून शब्द निघाले, ‘‘सत्पात्रे दान तर याला म्हणतात.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी ते स्वतः मोठे वैद्यकीय तज्ञ असूनही धर्म आणि जनकल्याण यांच्यासाठी जे पाऊल उचलले, त्यातून त्यांनी ‘त्याग’ या शब्दाचा अर्थ मला शिकवला. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीत अखंड नामजपाला महत्त्व आहे, तसे अखंड थोर कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. या ‘ऑनलाईन’ सत्संगातून परात्पर गुरु आठवले हे परम दयाळू, निडर, विचारांचे पक्के, सर्वांना संघटित करून ठेवणारे आणि अचूक दिशादर्शक असे व्यक्तीमत्त्व आहे’, हे लक्षात आले. ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून मला त्यांच्यातील हे गुण न्याहाळण्याची संधी मिळाली.
२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘विठोबा लागो तुझा हा छंद । जळो रे दुर्मतीचा हा गंध ।’, असे त्यांच्या भजनातून शिकवून ‘दुर्मतीचा गंध’ दूर करणे आणि त्यांचे महान शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुंदर असा ‘ईश्वरी गंध’ मनात भरणे : आजवर होऊन गेलेल्या थोर संतांचे विचार, शिकवण आणि त्यांचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व यांनी मी नेहमीच भारावलेला असतो. अनेक थोर संतांचे काव्य, अभंग, ओव्या आणि श्लोक यांतून त्यांनी दिलेली शिकवण मला मिळाली; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व शिकवणींना एक तीव्र गती मिळवून दिली.
प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘विठोबा लागो तुझा हा छंद । जळो रे दुर्मतीचा हा गंध ।’ असे त्यांच्या भजनातून शिकवून ‘दुर्मतीचा गंध’ दूर केला आणि त्यांचे महान शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुंदर असा ‘ईश्वरी गंध’ मनात भरला. धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचे शिष्य !
२ इ. ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून परात्पर गुरूंचे झालेले दर्शन : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या संस्थेच्या उपक्रमांद्वारे मला अनेक थोर संत आणि साधक यांची ओळख झाली. माझ्या आईच्या (सौ. नीलांबरी यांच्या) ‘रामनाथी आश्रमाला भेट द्यायला जाऊया ?’, या आग्रहाला मी आधीच मान दिला असता, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे’, मला शक्य झाले असते. परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वभावदोष-निर्मूलनाचे ग्रंथ काही वर्षे आधी मी वाचले असते. अशा अनेक माध्यमांतून परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीची अनुभूती मला येत आहे.
सर्व शिस्त आणि कौशल्य यांच्या पाठीमागे एक चांगला प्रेरणास्रोत असतो. या सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘ऑनलाईन’ माध्यमातून का असेना; पण दर्शन झाले आणि मला धन्य वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाची असलेली इच्छा आणि धडपड यांना थोडा विसावा मिळाला. भगवंताच्या कृपेनेच हे लाभले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निडरपणे आणि उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहून कार्य करणे अन् त्यातून सर्वांना प्रेरणा मिळणे
प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) त्यांच्या भजनांतून प्रेम आणि ईश्वरी चैतन्य यांचे प्रबोधन केले, तर त्यांच्या शिष्याने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) धर्मकार्यात क्रांती घडवून आणली. समाजातील मलीन विचार असलेल्या लोकांनी कार्यात अडथळा आणला, तरीही निडरपणे आणि उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहून परात्पर गुरु डॉक्टर त्यातून तरून जात आहेत अन् आम्हा सर्वांचेही रक्षण करत आहेत. ते सर्वांना प्रेरणा देत आहेत.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना !
संस्थेचे संत आणि साधक यांचेे मौल्यवान कार्य ‘सत्संग, सनातन प्रभातमधील लेख आणि आयोजित उपक्रम’ यांमधून स्पष्टपणे अनुभवायला येते. ‘सगुण’ या शब्दाचा अर्थ सर्वांच्या कार्यातून माझ्या लक्षात आला. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. ‘अशा थोर व्यक्तीमत्त्वाचे देहरूपी दर्शन मला होवो’, अशी मी ईश्वरचरणी सदासर्वदा प्रार्थना करतो. ‘गुरु-शिष्यांचे थोर कार्य असेच अखंड चालू राहो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
– श्री. सारंग ओझरकर, अमेरिका (१९.७.२०२०)
सनातनच्या कार्यक्रमांच्या आयोजनातील सुंदरता आणि सुसंगतपणा कौतुकास्पद !‘गुरुपौर्णिमा ‘ऑनलाईन’ सोहळा अतिशय सुंदर होता. सनातनचे संत आणि साधक ज्या शिस्तबद्ध पद्धतीने अन् कौशल्याने प्रतिदिन ऑनलाईन सत्संग अन् अन्य उपक्रम आयोजित करतात, त्याप्रमाणेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमही अतिशय सुसंगत जाणवला.’ (१९.७.२०२०) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |