रेल्वेस्थानकात ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालयाची भांडी काढून टाकण्याची मागणी !

नंदुरबार येथील हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन !

नंदुरबार, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील रेल्वेस्थानकात विदेशी शौचालयाची जी भांडी बसवण्यात आली आहेत, त्यांवर ‘हिंदुस्थान’ असे इंग्रजीत लिहिलेले आहे. हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे. या आशयाचे निवेदन पश्‍चिम रेल्वेचे महाप्रबंधक अलोक कंसल यांना समितीने दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते. – संपादक)

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

निवेदनात पुढे म्हटले आहे की, या देशाचे एक नाव ‘हिंदुस्थान’ही आहे. विदेशी पद्धतीच्या शौचालयाच्या भांड्यावर ‘हिंदुस्थान’ हा शब्द लिहिणे म्हणजे समस्त देशवासियांचा अपमान आहे. तसेच तो हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांचाही अपमान आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रांंतर्गत येणारी सर्व रेल्वेस्थानके, तसेच कार्यालये यांमधून ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालये त्वरित हटवून ‘हिंदुस्थान’ या महान शब्दाचा अपमान थांबवावा. एक मासाच्या आत ही कारवाई पूर्ण न झाल्यास हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

हिंदु सेवा साहाय्य समिती अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घेऊन अशी विदेशी शौचालये बनवणार्‍या आस्थापनांवरही कायदेशीर कारवाई करणार आहे. जे आस्थापन ‘हिंदुस्थान’ लिहिलेले विदेशी शौचालय बनवत आहे, त्यावर कडक कारवाई करावी, तसेच भारतभरात जेथे जेथे अशी विदेशी शौचालये लावली गेली आहेत, ती सर्व काढण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

निवेदनावर हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, जितेंद्र मराठे, राजू चौधरी, चेतन राजपूत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.