धनंजय मुंडे यांच्या दुसर्या पत्नीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
|
मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये स्वत:च्या २ मुलांना मुंडे यांनी शासकीय चित्रकूट बंगल्यामध्ये डांबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस सहकार्य करत नाहीत. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याची चेतावणीही शर्मा यांनी तक्रारीमध्ये दिली आहे.
या तक्रारीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतांना करुणा शर्मा यांनी लिहिले आहे, ‘मागील ३ मासांपासून धनंजय मुंडे यांनी मुलांना बंगल्यामध्ये डांबून ठेवले आहे. मला त्यांना भेटू दिले जात नाही. २४ जानेवारी या दिवशी मुलांना भेटण्यासाठी मी बंगल्यावर गेले असतांना मुंडे यांनी पोलिसांना बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यामध्ये माझी मुले सुरक्षित नाहीत. यामध्ये १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. मुंडे मुलांसमोर अश्लील कृत्ये करतात. माझ्या मुलांसमवेत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे उत्तरदायी असतील. माझी मुलांशी भेट घालून दिली नाही, तर २० फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यासाठी चित्रकूट बंगला किंवा मंत्रालय यांच्यासमोर किंवा आझाद मैदानावर मला उपोषण करण्यासाठी अनुमती द्यावी.’
धनंजय मुंडे यांनी वर्ष २००३ पासून परस्पर सहमतीने करुणा शर्मा यांच्याशी संबंध ठेवले असल्याची स्वीकृती यापूर्वी दिली आहे.