बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करणार !
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध शैक्षणिक तरतुदींचा समावेश
मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्यांसाठी लाजिरवाणे आहे !
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करून नवीन बोधचिन्ह दिले जाणार आहे. जनतेत सकारात्मक दृष्टीकोन व्हावा याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्थसंकल्पात नमूद केले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला महापालिकेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी २ सहस्र ९४५.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळेतील १ सहस्र ३०० वर्गखोल्या ‘डिजिटल क्लासरूम’ होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात २८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या २७ शालेय वस्तूंसाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सी.बी.एस्.ई. शाळांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे.
संगीततज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन्.एम्. जोशी मार्ग महापालिका शाळेत ‘मॉडेल संगीत केंद्र’ उभारण्यात येणार आहे. यात स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय या सेवा पुरवल्या जातील. त्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संसाधनांसाठी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी १५.९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सिलिंग कार्यक्रम व्हॉट्सअॅप आणि चॅट बोट यांद्वारे राबवणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे २०२१ पासून ‘करिअर टेन लॅब’ या संस्थेच्या वतीने नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी २१.१० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.