कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

पत्रकार परिषदेत बोलतांना राजेश क्षीरसागर आणि अन्य

कोल्हापूर, ३ फेब्रुवारी – विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी साकार केले आहे. आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. २ फेब्रुवारीला ‘रेसिडेन्सी क्लब’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली शक्ती दाखवली आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेस पोषक वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. शिवसेना ही निवडणूक विकासाच्या सूत्रावर लढणार आहे. थेट वाहिनी योजनेच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा, शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासह ऑडिटेरियम, गारमेंट महाविद्यालय आदींविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले, ऐतिहासिक पन्हाळा गड उजळवून गडाचे सौंदर्य वाढवण्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी संमत असलेल्या ८० कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली असून उर्वरित ७१ कोटी रुपये दोन टप्प्यांत देण्यात येणार आहेत.’’

या वेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, शिवसेना गटनेते राहुल चव्हाण,  सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, माजी परिवहन सभापती सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले यांसह अन्य उपस्थित होते.