पंढरपूर येथील साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना ग्रंथ वितरणाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. विविध विषयांवरील विशेषांकांना प्रायोजक मिळवण्याची सेवा करतांना पुष्कळ आनंद होणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी ग्रंथ वितरणाच्या सेवेसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यास सांगणे
‘वर्ष २००३ मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध विषयांवर विशेषांक प्रकाशित केले जात होते. त्या वेळी मी बीड आणि सोलापूर येथे प्रसारसेवा करत होतो. या विशेषांकांसाठी प्रायोजक मिळवण्याची सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत असे. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी या विषयावर माझे बोलणे झाले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘आपण ईश्वराने निर्माण केलेले ज्ञानरूपी ग्रंथ समाजात वितरित करण्याचा प्रयत्न केल्यास पुढील काळात समाजाला अनेक पिढ्या ग्रंथ रूपाने ज्ञान मिळेल. तुम्ही ग्रंथ वितरणाच्या सेवेसाठी प्रयत्न करू शकलात, तर त्याचा समाजाला पुष्कळ लाभ होईल.’’
मी हे सर्व ऐकून घेतले; पण त्या वेळी मला ते समजले नाही. त्यानंतर मला त्याचा विसर पडला.
२. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे ‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचावेत’, यासाठी दुचाकीवरून लांबचा प्रवास करूनही कधीही थकवा न जाणवणे आणि कशाचीही भीती न वाटणे
वर्ष २००५ मध्ये मला परात्पर गुरुदेवांनीच त्यांचे हे बोलणे, त्यांची कृपाशक्ती आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व, हे सूक्ष्मातून पुन्हा लक्षात आणून दिले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी दुचाकीवरून २०० ते ४७० कि.मी. (उदा. पंढरपूर ते जळगाव) प्रवास करत होतो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला या प्रवासात कधीच थकवा जाणवला नाही किंवा कशाची भीतीही वाटली नाही. माझ्या मनात ‘माझे परात्पर गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांंडनायक आहेत. मग मला कशाची काळजी आहे ?’, हा एकच विचार असे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने मी ही अनुभूती वर्ष २००६ पासून आजपर्यंत घेत आहे. आजही तेच माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक वाचनालये या ठिकाणी सनातनने प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांच्या वितरणासाठी संपर्क करण्याची माझी सेवा आजही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने चालू आहे.
३. ग्रंथवितरणाच्या सेवेसाठी केलेले प्रयत्न
३ अ. ‘सद्गुरु आणि संत ही देवाची रूपे आहेत’, असा भाव ठेवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सेवा करण्याचा प्रयत्न करणे : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सत्संग, प्रत्येक गुरुवारचा भाववृद्धी सत्संग, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संग, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन हे सर्व मी प्रत्येक आठवड्याला नियमितपणे ऐकण्यास आरंभ केला. तेव्हापासून माझ्यात पालट होत आहेत. ‘सद्गुरु आणि संत ही देवाची रूपे आहेत’, असा भाव ठेवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी साधना करण्याचा प्रयत्न करत आहे.
३ आ. प्रसारकार्यासाठी जाण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करणे : प्रसारकार्यासाठी ज्या गावात जायचे, तिथे जाण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करतो आणि ‘भगवंता, हे नियोजन योग्य आहे ना ?’, असे त्यांना विचारतो. त्या वेळी ते सूक्ष्मातून काही पालटही सुचवतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांचे छायाचित्र नेहमी माझ्या समवेत असते.
३ इ. मी सार्वजनिक वाचनालये आणि विविध देवस्थाने इथे गेल्यावर तेथील संबंधित व्यक्तींना इतर ठिकाणी ग्रंथ वितरित करून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी होण्यास सांगतो.
४. समाजातील व्यक्तींशी संपर्क करून जवळीक साधणे
४ अ. लोकांशी मनमोकळेपणाने चर्चा केल्याने त्यांनी स्वतःहून नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे : मी समाजातील व्यक्तींना भेटण्यासाठी गेल्यावर त्या व्यक्तींचे कुटुंबीय, त्यांचा व्यवसाय, त्यांचे समाजातील चांगल्या व्यक्तींशी असलेले संबंध यांविषयी मनमोकळेपणाणे चर्चा करतो. त्यामुळे त्या व्यक्तींकडूनही मला पुष्कळ शिकायला मिळते. काहीजण स्वतःहून मला नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देतात.
४ आ. अनेक लोकांनी सनातनचे ग्रंथ घेऊन संस्थेच्या कार्यात सहभागी होणे, तसेच अनेक कुटुंबांनी साधनेला प्रारंभ केल्यामुळे आज ती कुटुंबे आनंदी असणे : अशा पद्धतीने प्रयत्न केल्यामुळे आज सांगली जिल्हा पूर्वभाग, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये, तसेच उज्जैन येथील कुंभमेळा आणि नवी मुंबई या ठिकाणी गुरूंच्या कृपेने माझ्याकडून अखंड सेवा घडली. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाचेच फळ आहे.
या संपर्कांच्या माध्यमातून अनेक लोकांनी सनातन-निर्मित ग्रंथ घेऊन संस्थेच्या कार्यात सहभाग घेतला, तसेच अनेक कुटुंबांनी साधनेला प्रारंभ केला आहे. त्यामुळे आज ती कुटुंबे आनंदी आहेत.
५. सतत भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यामुळे सेवेतून पुष्कळ आनंद मिळणे
प्रसारकार्यासाठी १५ दिवसांत चारचाकीने माझा सरासरी ७० ते १५० कि.मी. पर्यंतचा प्रवास होतो. या प्रवासाच्या कालावधीत माझा नामजप चांगला होतो, तसेच माझे चिंतनही होते. त्यामुळे मला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी, तसेच सर्व सद्गुरु, संत अन् ज्येष्ठ साधक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. आप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर (२६.१०.२०१९)
|