सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरुदेवांच्या चरणी साधकांचे कृतज्ञतापुष्प !
‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने या घोर कलियुगामध्ये माझी गुरुमाऊलीची भेट झाली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझ्यासारख्या जिवाने गेल्या अनेक जन्मी जे काही पुण्य केले आहे, त्याचेच फलस्वरूप म्हणून गुरुमाऊलीची भेट झाली आहे. या जन्मी मी अध्यात्मवेडी होऊन श्री गुरूंच्या शोधात कुठेही गेले नव्हते. भगवंतानेच या जन्मामध्ये ही अनमोल भेट दिली आहे, यासाठी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवांंचे नाव जरी मनात आले, तरी ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता’, या शब्दाचे तरंग संपूर्ण शरिरात उमटतात. त्यांनी आतापर्यंत आम्हाला स्थुलातून आणि सूक्ष्मातून जे काही दिले आहे, ते सर्व शब्दातीत अन् अनमोल आहे. महर्षींनी ‘ते विष्णूचा अवतार आहेत’, असे आता सांगितले; परंतु त्यांच्याशी आमचा संपर्क आला, तेव्हापासूनच त्यांनी आम्हा सर्व साधकांना ते अवतार असल्याची प्रचीती दिली आहे.
मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्यानंतर लगेचच माझा गुरुमाऊलीशी संपर्क झाला. तेव्हापासून त्यांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण करते.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/447787.html |
४. अहंभावशून्य असलेले परात्पर गुरु डॉक्टर !
४ अ. स्वतः उच्च आध्यात्मिक पातळीवर असूनही कुणालाही त्याची पुसटशी कल्पनाही येणार नाही, अशा प्रकारे प.पू. शामराव महाराजांकडे शिष्य भावात राहून शूद्र वर्णाच्या सेवा करणे : प.पू. शामराव महाराज यांच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांनी केवळ ‘त्रास असणार्या साधकांसाठी महाराज कसे विविध उपचार करतात ?’, हे शिकले असे नाही, तर त्यांनी महाराजांच्या आश्रमातील शूद्र वर्णाच्या सेवाही केल्या. प्रत्यक्षात प्राणशक्ती अल्प असणे आणि वयोमान यांमुळे त्यांची शारीरिक स्थिती चांगली नव्हती, तरीही ते आश्रमातील स्वच्छता करणे यांसारख्या शूद्रवर्णाच्या सेवाही अगदी सहजतेने करत असत.
५. समाजालाही संतांचे महत्त्व समजावे, यासाठी प.पू. शामराव महाराज यांच्यावर २ ग्रंथ लिहून ते प्रकाशित करणे आणि त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करणे
प.पू. शामराव महाराज यांची गुणवैशिष्ट्ये लिहून काढून त्यांनी ‘शिव-अवतार शामराव महाराज यांचे चरित्र’ आणि ‘एका मंदिराच्या स्थापनेमागील दोन अवतारांचे अदृश्य महायुद्ध’, असे २ ग्रंथ लिहिले. केवळ गुरुदेवच प.पू. शामराव महाराज यांच्या गुणांचे अशा पद्धतीने निरीक्षण करून ग्रंथांचे संकलन करू शकतात. अध्यात्मातील एक नवीन विषय त्यांनी समाजासमोर अतिशय सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजेल, अशा भाषेत मांडला आहे.
६. प.पू. शामराव महाराज यांच्या शिष्यांनीही गुरुमाऊलीची प्रीती अनुभवणे, ‘गुरुमाऊली आता तिकडे जाणार नाही’, असे समजल्यावर त्यांना भावाश्रू अनावर होणे
प.पू. शामराव महाराज यांच्या भक्तांवरही गुरुदेवांनी सनातनच्या साधकांप्रमाणेच प्रेम केले. त्यामुळे महाराजांचे भक्तही अंतर्मनातून गुरुदेवांचेच झाले होते. तेथील सर्व भक्तांच्या समवेत गुरुदेवांची काही दिवसांतच पुष्कळ जवळीक झाली होती. ‘जेव्हा आता गुरुमाऊली त्यांच्या आश्रमामध्ये जाणार नाही’, असे ठरले, त्या वेळी त्यांच्या भक्तांनाही हा विरह सहन न झाल्याने त्यांना भावाश्रू अनावर झाले होते.
‘गुरुदेवांमध्ये सर्वज्ञता असूनही ते प.पू. शामराव महाराज यांच्याकडे शिकण्यासाठी का जात होते ?’, याचा उलगडा आज होतो. त्यांनी शिकण्याचे निमित्त करून प.पू. महाराजांची गुणवैशिष्ट्ये सर्वांसमोर आणली. ‘गुरुदेव, शिष्यभावात राहून प्रत्येक प्रसंगातून कसे शिकायचे ?’, हा तुमचा गुण आम्हा सर्व साधकांमध्ये लवकरात लवकर येवो, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !
७. प.पू. शामराव महाराज यांच्याकडून आल्यावर परात्पर गुरुदेवांनी मिरज आश्रमामध्ये साधकांसाठी नामजपादी उपाय करणे
७ अ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर पनवेल येथून गोवा येथे जातांना परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात येणे आणि मिरज येथील साधकांना सेवेत येत असलेल्या अडचणी पाहून त्यांनी गोवा येथे जाणे रहित करणे आणि पुढे सर्व घडी नीट बसेपर्यंत ४ मास मिरजला रहाणे : परात्पर गुरुदेव गुरुपौर्णिमेच्या काळात पनवेल येथे गेले होते. पनवेलहून परत गोवा येथे जातांना ते ४ दिवसांसाठी म्हणून मिरज आश्रमात आले होते. तेव्हा सूक्ष्म सेवेच्या अंतर्गत असणार्या सेवेचा व्याप आणि आम्हा साधकांच्या आवाक्याबाहेरील सेवा पाहून त्यांनी त्यांचे गोव्याला जाण्याचे रहित केले आणि ते मिरज येथेच राहिले. मिरज येथे थांबून त्यांनी ‘सूक्ष्म सेवेच्या अंतर्गत सेवेची घडी कशी बसवायची ?’, हे आम्हाला शिकवले. आम्हाला साहाय्य करण्यासाठी त्यांनी त्यांचे सर्व नियोजन पालटले. सूक्ष्म सेवेच्या अंतर्गत असणार्या सेवेची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. गुरुदेव मिरज येथे आल्यानंतर त्यांनी तो सर्व भाग पाहिला. त्रास होणार्या साधकांची संख्या अधिक होती. त्या तुलनेमध्ये सेवा करणार्या साधकांची संख्या पुष्कळच अल्प होती. ‘अशी सर्व परिस्थिती प्रतिकूल असतांनाही सर्व सेवा नियोजनबद्ध कशा करायच्या ? आणि साधकांना कसे साहाय्य करायला हवे ?’, हे गुरुदेवांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला शिकवले.
त्या वेळी गुरुदेवांकडे त्यांच्यासाठी लागणारे वैयक्तिक, तसेच सेवेच्या अनुषंगाने लागणारे साहित्य पुरेसे नव्हते. त्यांनी आवश्यक ते सर्व साहित्य गोवा येथून मागवून घेतले. त्यातून त्यांनी ‘प्रत्येक समस्येवर उपाययोजना असतेच. केवळ आपण उपाययोजना काढायची आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे’, हे आम्हाला दाखवून दिले.
७ आ. सूक्ष्माच्या संदर्भातील सेवेची घडी बसवून देणे : ‘उपलब्ध साधकसंख्येत या सूक्ष्मच्या संदर्भातील सेवांची घडी बसवणे अशक्य आहे’, असे आम्हाला वाटत होते; परंतु गुरुदेवांनी काही दिवसांच्या त्यांच्या कृतीतून ‘आहे या परिस्थितीत घडी कशी बसवायची ?’, हे दाखवून दिले आणि काही कालावधीतच त्यांनी आम्हाला ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवले.
७ इ. सेवांची घडी बसवतांना कोणकोणत्या गोष्टी पहायला हव्यात, हे शिकायला मिळणे : सेवांची घडी बसवायची असल्यास कोणकोणत्या गोष्टींकडे पहायला हवे, ते शिकायला मिळाले. यामध्ये सेवेतील अडचणी, साधकांचे दृष्टीकोन, तसेच त्यांचे उत्तरदायी असणार्या साधकांनी साहाय्य करणे, अशा वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करणे अपेक्षित आहे, हे लक्षात आले. अशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टींच्या कार्यपद्धती बसवून दिल्या आणि सर्व सेवांची घडी काही दिवसांतच योग्य प्रकारे बसवून दिली.
७ ई. ध्वनीचित्रीकरण करण्यास शिकवणे : साधकांना होणार्या त्रासांचे स्वरूप पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावे, यासाठी आपण ध्वनीचित्रीकरण करत होतो. प्रत्यक्षात आम्हाला कोणालाच याविषयीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे आमच्याकडून पुष्कळ चुका होत होत्या. त्या वेळी ‘ते प्रत्येक चूक आम्हाला सांगत असत आणि ती कशी सुधारायची ?’, हेही शिकवत असत. गुरुदेवांनी आम्हा अज्ञानी आणि असमर्थ जिवांकडून त्यांना अपेक्षित असे ध्वनीचित्रीकरण करून घेतले.
७ उ. एखाद्या व्यक्तीला असलेला वाईट शक्तींचा त्रास हा पूर्वज, त्या व्यक्तीचा वाईट शक्तींशी असलेला पूर्वजन्मातील देवाण-घेवाण हिशोब आणि समष्टी प्रारब्ध, अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असणे : एखाद्याला असणारा वाईट शक्तीचा त्रास हा पूर्वज, वाईट शक्तीचा त्या व्यक्तीशी असलेला पूर्वजन्मातील देवाण-घेवाण हिशोब आणि समष्टी प्रारब्ध यांवर अवलंबून असतो. उपाय करायला आरंभ केल्यानंतर ‘त्या व्यक्तीची साधना, त्रासाविरुद्ध लढण्याची तळमळ, उपाय करणार्यांची क्षमता, त्यांनी केलेले अचूक निदान, त्यांनी सांगितलेले योग्य उपाय आणि काळ’, अशा अनेक गोष्टींवर त्रास अल्प होणे अवलंबून असते. त्यामुळे ‘एखाद्याचा त्रास किती कालावधीनंतर अल्प होणार ?’, हे वरील सर्व गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांना सरसकट एकच उपचार लागू पडत नाहीत. त्यामुळे ‘एखाद्याचा त्रास लवकर न्यून झाला आणि एखाद्याचा त्रास अजून जात नाही’, याचे उत्तरही वरील कारणांवर अवलंबून असते’, हे त्यांनी शिकवले.
(क्रमशः)
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०१८)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/448470.html
|