साधकांनी दिवसभरात विविध प्रसंगी करावयाच्या प्रार्थना !
१. स्नानापूर्वी
‘हे जलदेवते, ‘तू समस्त प्राणीमात्रांचे भरण-पोषण करतेस. तुझ्या माध्यमातून आम्हाला भगवंताचे चैतन्य मिळू दे. आम्हा सर्वांवर आपतत्त्वाचे उपाय होऊ देत. आमच्या शरिरावरील रज-तमाचे आवरण नष्ट होऊन आमच्यामध्ये ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढू दे.
२. भाववृद्धी सत्संग
अ. हे भगवंता, मला भाववृद्धी सत्संगाचा चैतन्याच्या स्तरावर लाभ होऊ दे. भाववृद्धीसाठी सातत्याने करावयाचे प्रयत्न तुझ्या कृपेने माझ्याकडून योग्य दिशेने होऊ देत.’
– सौ. अंजली बंडेवार, सोलापूर
आ. ‘हे श्रीकृष्णा, या भाववृद्धी सत्संगात मला अतिशय अनमोल संजीवनी मिळते. ‘मन आणि कृती यांच्या प्रत्येक स्तरावर संघर्ष करण्यासाठी तूच मला संजीवनी देतोस’, हाच विचार माझ्या मनात निरंतर राहू दे.
३. साधना
अ. हे श्रीकृष्णा, केंद्रातील सर्व साधकांची मने जुळू देत. आम्हा सर्व साधकांमध्ये संघटितपणा निर्माण होऊ दे.
आ. हे श्रीकृष्णा, सर्व साधकांना सेवा करतांना होणार्या चुकांची जाणीव होऊ दे.’
– सौ. शुभांगी पाटणे, सांगोला, जिल्हा सोलापूर.
इ. ‘हे श्रीकृष्णा, आम्हा सर्व साधकांना कृष्णबंधाने अखंड जोडून ठेव आणि आम्हा सर्वांना एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करता येऊ दे.
ई. हे श्रीकृष्णा, समष्टी सेवा करतांना समाजातील अनेक जिज्ञासूंच्या माध्यमातून तुझे गुण आम्हाला शिकता येऊ देत.’
– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड.
उ. ‘हे दयाघना, दिवसभर करत असलेली कृती माझ्याकडून ‘तुझ्या चरणांची सेवा आहे’, या भावाने साधना म्हणून होऊ दे. प्रत्येक कृतीचे कर्तेपण तुझ्याकडेच असू दे. मी करत असलेल्या कृतीत भक्तीभाव असू दे. डोळ्यांची पापणी लवेपर्यंतही मला तुझा विसर पडू देऊ नकोस. मला प्रत्येक कृती करतांना तिच्याशी नामजप जोडता येऊ दे.
ऊ. हे भगवंता, ‘हा देह तुझाच आहे आणि यातील चैतन्य, म्हणजे तूच आहेस’, याची मला सतत जाणीव असू दे.
ए. हे सूर्यनारायणा, मला साधनेसाठी चांगले आरोग्य दे आणि धर्मसेवा करण्यासाठी मला तुझ्या तेजाद्वारे बळ दे.
४. ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे आणि विज्ञापने (जाहिराती) आणणे या सेवेला जातांना
अ. हे ईश्वरा, तूच आमच्या समवेत राहून सेवेच्या अनुषंगाने सनातनच्या हितचिंतकांना योग्य ती सूत्रे सांगता येण्यासाठी आमच्या शब्दांत चैतन्य दे. देह, मन, वाणी आणि बुद्धी यांमध्ये तुझेच अस्तित्व असू दे.
आ. हे ईश्वरा, गुरुदेवांचा संदेश पोचवणार्या नियतकालिकांच्या माध्यमातून गुरुदेवांचे चैतन्य सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी तूच आम्हाला दिशादर्शन कर. साधनामार्गावरील सर्व जिवांमध्ये धर्मबीज रोवले जाऊ दे.
५. कृतज्ञता
हे भगवंता, ‘आजचा दिवस मला तुझ्याच कृपेने पहायला मिळाला’, यासाठी तुझ्या चरणी मी कृतज्ञ आहे.’
– सौ. अंजली बंडेवार, सोलापूर (वर्ष २०१७)