गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

१. धर्मप्रेमी श्री. सुमित कश्यप, डेहराडून

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या सत्संगात ‘आपल्या जीवनात गुरूंचे अत्यंत महत्त्व आहे’, हे लक्षात आले. गुरु आपल्याला ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जातात. त्यासाठी आवश्यक असलेली आध्यात्मिक शक्ती आपण आध्यात्मिक गुरूंद्वारेच प्राप्त करू शकतो.’

२. धर्मप्रेमी श्री. प्रमोद कुशवाहा, वाराणसी

‘गुरुपौर्णिमेच्या ‘ऑनलाइन’ कार्यक्रमात झालेल्या सत्संगात आम्हाला पुष्कळच चांगला अनुभव आला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘आश्रमात रहाणार्‍या एका मुलीचा विवाह अमेरिकेत रहाणार्‍या मुलाशी झाला. विवाहानंतर जेव्हा तिला आपल्या पतीसमवेत अमेरिकेला जायचे होते, तेव्हा ती पुष्कळ रडत होती; कारण तिला आश्रम सोडून जाण्याची इच्छा नव्हती. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘हा तर सृष्टीचा नियम आहे आणि भगवंत सर्वत्र आहे. तू अमेरिकेच्या घरालाच आश्रम बनवण्याचा प्रयत्न कर.’’ त्यानंतर आपल्या पतीच्या समवेत अमेरिकेला जाऊन तिने घराला आश्रम बनवण्याचा प्रयत्न करण्यास आरंभ केला. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सनातन आश्रमाचा फलक लावला. तिने ‘घर हाच आश्रम आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न केले. परिणामस्वरूप ते घर आश्रमच झाले. एकदा तिच्या यजमानांचे मित्र त्यांच्या घरी आले होते. विदेशी पद्धतीनुसार तिच्या यजमानांनी त्यांच्या मित्राला ‘मद्यपान करणार का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांच्या मित्राने म्हटले, ‘‘तुमचे घर तर मंदिर आहे. येथे मद्यपान करण्याची इच्छासुद्धा होत नाही.’’ हे सर्व पाहून पुष्कळच चांगले वाटले. जय हो परात्पर गुरुदेवजी !’

३. डॉ. रामचंदेश्‍वरदत्त वाजपेयी, लखनऊ

‘कार्यक्रम अतिशय सुंदर होता. सर्वप्रथम सद्गुरूंची पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम ऐकला. महोदय, भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी आणि तो भाव आम्हा सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी आपले हे प्रयत्न पुष्कळच कौतुकास्पद आहेत. आपण सर्व जण आपली मुळे कापत चाललो आहोत. कधी कधी वाटते, ‘आपल्या संस्कृतीवर मोगल आणि इंग्रज यांचा जो दुष्प्रभाव पडला आहे, त्यापासून कसे वाचू शकतो ?’ ‘आपल्या भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना आपणा सर्वांमध्ये संस्कारांच्या रूपात पुनर्स्थापित व्हावी’, यासाठी आपण आणि आपली संस्था यांच्या माध्यमातून होत असलेले कार्य स्तुत्य आहे. धन्यवाद !’

४. श्री. हिमांशु, आय.ए.एस्. अधिकारी

‘पुष्कळ छान ! धन्यवाद ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्कळच स्पष्ट होते.’

५. अधिवक्ता अनय श्रीवास्तव, प्रयागराज

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाच्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मी दुसर्‍या दिवशी आमच्या घरी पूजन केले. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी नामजपाचे महत्त्वसुद्धा १ सहस्र पटींनी मिळते’, हे कार्यक्रमात ऐकल्यानंतर त्या दिवशी मी अधिकाधिक मंत्रजप केला. परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन अतिशय चांगले होते. ‘सोप्या पद्धतीने जी साधना सांगितली गेली, त्यानुसार प्रयत्न करायला पाहिजेत. त्यामुळे ते आपल्या अंगवळणी पडेल. जीवनात कोणताही स्वार्थ असता कामा नये’, हेसुद्धा लक्षात आले.’

६. अधिवक्ता लक्ष्मी शरण शुक्ला, गोरखपूर

‘गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने जो लाभ झाला, त्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.’

७. श्री. अभिषेक सिंह, सुलतानपूर

‘परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मनाच्या स्तरावर परिवर्तन झाल्याचे लक्षात येत आहे. ईश्‍वरकृपा आणि परात्पर गुरुदेव यांचा आशीर्वाद यांमुळे माझी साधना वाढली आहे आणि इच्छाही न्यून झाल्या आहेत.’

८. श्री. आदर्श सिंह, बलिया

‘मनाला शांती प्रदान करणारा कार्यक्रम होता. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची वाणी मनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास साहाय्यक आहे.’

९. श्री. केशवानंद महापात्रा, भुवनेश्‍वर

‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमातून आणि विशेषतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक ग्रंथ हे गोष्टीच्या पुस्तकांसारखे न वाचता त्याचे एकेक पान सावकाश वाचले पाहिजे आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे वाचले आहे, ते आचरणात आणायला पाहिजे; कारण तात्त्विक ज्ञानाच्या महासागरापेक्षा कृतीचा एक थेंब अधिक उपयुक्त आहे आणि साधना हे कृतीचे शास्त्र आहे, तात्त्विक ज्ञानाचे नाही.’’

त्यांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक प्रगती एका रात्रीत न होता हळूहळू होत असते. प्रगती ही ‘त्या साधकाची ईश्‍वरप्राप्तीची तळमळ किती आहे आणि तो साधनेप्रती किती गंभीर अन् जागृत आहे ?’, यावर अवलंबून असते.’’ त्या दिवशी ‘स्वयंसूचना’ याविषयी प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांकडूनच उदाहरणासहित ऐकून त्यातून शिकायला मिळाले. सिद्धांतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष उदाहरण ऐकल्यामुळे मला अधिक शिकायला मिळाले.

सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, साधकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर परात्पर गुरुदेव सतर्कतेने आणि एवढ्या प्रेमाने देत होते की, त्यातूनसुद्धा पुष्कळ शिकायला मिळाले.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक