पुणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज
पुणे – येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शरजील उस्मानी याने भारतीय संघराज्य आणि हिंदू यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली. ‘हिंदु समाज सडलेला आहे’, असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या विधानासह दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केली आहेत. भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ‘मी भारतीय संघराज्य मानत नाही’, असे प्रक्षोभक विधान केले आहे. त्याची ही विधाने भारतीय दंडसंहितेच्या १५३ अ आणि २०५ अ, तसेच १२४ अ या कलमांनुसार गुन्हा ठरणारी आहेत. त्यामुळे ‘उस्मानी याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी’, असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अधिवक्ता प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याला दिला आहे.