गैरव्यवहार केल्याप्रकरणी परभणी येथील ३ पोलीस कर्मचारी निलंबित
परभणी – एका असाहाय्य महिलेचा अपलाभ घेणे, अवैध व्यावसायिकांकडून पैसे वसूल करणे, तसेच वाळू माफियांकडून हप्ता घेणे या प्रकरणी परभणी पोलीस दलातील ३ कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले आहे. (गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे. – संपादक)
१. पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद रत्ने हे अवैध वाळूचा उपसा करणार्यांसह ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रत्येक मासाचे पैसे वसूल करत असल्याचे सिद्ध झाले होते. यामध्ये स्वत:चा आर्थिक लाभ करून घेतला, तसेच पदाचा अयोग्य वापर केल्याचे त्यांच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.
२. मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख यांनी अवैध मद्य विक्रेत्यांसह गुटखा विक्री करणार्यांकडून पैसे वसूल करत कर्तव्यात कसूर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
३. सेलू ठाण्यातील कर्मचारी संजय साळवे यांनी एका महिलेशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.