सनातन निर्मित सत्संगांच्या ‘लिंक’ समाजातील व्यक्तींना पाठवण्याची सेवा करतांना ‘देव भरभरून देत आहे’, याची प्रचीती घेणारे पंढरपूर येथील श्री. अप्पासाहेब सांगोलकर !
‘एकदा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये अणि कु. दीपाली मतकर यांनी सत्संगात सांगितले, ‘‘हितचिंतक वाचक, विज्ञापनदाते आणि अर्पणदाते यांना सत्संगाची ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवूया; कारण या आपत्काळात समाजातील व्यक्तींना आधाराची आवश्यकता आहे. या स्थितीत समाजातील व्यक्ती काहीतरी साधना करतील.’’ या विचाराने प्रेरित होऊन देवाने प्रयत्न करण्यासाठी मला शक्ती दिली. त्यांपैकी काही सूत्रे पुढे देत आहे.
मी ईश्वरी कृपेने समाजातील ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलो होतो, त्यांना भ्रमणभाष करून मी त्यांची विचारपूस केली. ‘त्यांना या आपत्काळात सनातन संस्थेच्या वतीने होत असलेल्या सत्संगाची ‘लिंक’ किंवा ‘पोस्ट’ पाठवू शकतो का ?’, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांक विचारून त्यांची सूची सिद्ध करत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सामर्थ्य लक्षात आले.
१. लातूर येथील ग्रंथ चळवळीच्या प्रमुखांना भ्रमणभाष करणे
१ अ. लातूर येथील ग्रंथ चळवळीच्या प्रमुखांना अनेक वेळा भ्रमणभाष करूनही त्यांच्याशी संपर्क न होणे; मात्र परात्पर गुरुमाऊलींना प्रार्थना करून भ्रमणभाष केल्यावर त्यांच्याशी संपर्क होणे : एकदा मी लातूर येथील ग्रंथ चळवळीच्या प्रमुखांना भ्रमणभाष करून त्यांचा ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांक घेण्यासाठी संपर्क करत होतो. त्यांना अनेक वेळा भ्रमणभाष करूनही त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी परात्पर गुरुमाऊलींना प्रार्थना केली, ‘भगवंता, या प्रयत्नांत माझे काही चुकले आहे का ? त्या चुकीसाठी मला क्षमा कर. त्या प्रमुखांना भ्रमणभाष घेण्यासाठी अडथळे येत असतील, तर ते दूर होऊन तूच त्यांना धर्मकार्यात सहभागी करून घेे.’ मी पुन्हा एकदा संबंधितांना भ्रमणभाष लावला. देवाच्या कृपेने त्यांनी भ्रमणभाष उचलला.
१ आ. ग्रंथ चळवळीच्या प्रमुखांनी त्यांना ‘लिंक’ पाठवण्यासाठी होकार देणे आणि सार्वजनिक वाचनालयांच्या प्रमुखांना ‘लिंक’ पाठवण्याचे मान्य करणे : प्रथम मी त्यांच्याशी औपचारिक चर्चा करून नंतर आपत्काळासंदर्भात चर्चा केली. त्यांना मी म्हटले, ‘‘दळणवळण बंदीमुळे आपण घरी आहात. आपल्याला पुष्कळ वेळ उपलब्ध आहे. आपल्या ‘व्हॉट्सअॅप’वर सनातन निर्मित सत्संगाची ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवू शकतो का ? जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांच्या प्रमुखांना तुम्ही ही ‘लिंक’ पाठवू शकाल का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अवश्य पाठवा. मी पुढे पाठवण्यासाठी प्रयत्न करतो.’’
‘त्यांचा सहभाग हा गुरुमाऊलींना केलेल्या प्रार्थनेचे फळ आहे’, हे माझ्या लक्षात आले.
२. सोलापूर येथील एका सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुखांना संपर्क करणे
२ अ. सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुखांनी साधक आपत्काळात स्थिर असल्याचे पाहून साधकाचे कौतुक करणे : एकदा मी सोलापूर येथील एका सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुखांना भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही पुष्कळ भाग्यवंत आहात. तुम्ही एवढी मोठी नोकरी सोडून या ईश्वरी सेवेत आनंदात आहात. समाजातील व्यक्ती दुःखी असतांना तुम्ही याही स्थितीत स्थिर कसे आहात ? तुम्हाला ‘पुढे असे संकट येणार आहे’, याविषयी आधी संकेत मिळाले होते का ?; म्हणून तुम्ही स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली.’’
२ आ. सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुखांनी ‘प्रत्येक व्यक्तीने त्याचे कर्तव्य करत साधना करायला हवी’, असे सांगणे : त्यावर मी त्यांना विनम्रपणे म्हणालो, ‘‘ही सर्व गुरूंची लीला आहे. गुरूंची भक्तीच सर्व जगाला तारून नेते. यासाठी प्रत्येक व्यक्तीने साधना करायला हवी.’’ ते म्हणाले, ‘‘मानवाने विज्ञानात एवढी प्रगती केली आहे; पण जगात ‘कोरोना’ विषाणूला अद्याप कोणीही थोपवू शकले नाही. केवळ ईश्वरच हे करू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याचे कर्तव्य करत साधना करायला हवी.’’
२ इ. सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुखांनी धार्मिक व्यक्तींना सत्संगाची लिंक पाठवण्यासाठी होकार देणे : तेव्हा त्यांचे विचार ऐकून मी त्यांना विनंती केली, ‘‘सनातन संस्थेच्या सत्संगाची ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ आपल्याला पाठवू शकतो का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सध्या पुष्कळ वेळ आहे. अशा ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ मला अवश्य पाठवा.’’ त्यानंतर त्यांना ज्यांना धार्मिक आवड आहे, अशांना ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवण्याविषयी विचारले असता त्यांनी होकार दिला. ते म्हणाले, ‘‘हा दळणवळण बंदीचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही सोलापूर येथे या. मी तुम्हाला अनेक जणांकडे घेऊन जातो.’’ देवाच्या कृपेने ते माझ्याशी एवढे मनमोकळेपणाने बोलले. त्या वेळी माझी भगवंताच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
३. सोलापूर येथील एका नगरसेवकांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी ‘परिचयातील व्यक्तींना सत्संगाची ‘लिंक’ पाठवतो’, असे सांगणे
सोलापूर येथील एका नगरसेवकांनी राज्यस्तरीय ग्रंथालयाच्या अधिवेशनाच्या वेळी साधकांना सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावायला सहकार्य केले होते. मी त्यांना भ्रमणभाष करून त्यांनी त्या वेळी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मी त्यांच्याशी सध्याच्या स्थितीविषयी चर्चा करून त्यांना ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवण्याविषयी विचारणा केली. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : तुम्हाला या ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’चा लाभ होईल. तुम्ही तुमच्या परिचयातील व्यक्तींना अशा ‘लिंक’ पाठवू शकता का ?
नगरसेवक : अशा ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ अवश्य पाठवा. मी या ‘लिंक’ समाजात पुढे पाठवण्याचा प्रयत्न करतो.
४. लातूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकांना संपर्क करणे
४ अ. सेवानिवृत्त शिक्षकांनी सत्संगाची ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवायला सांगणे : लातूर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. दंडे सरांना भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांच्याशी आपत्कालीन स्थितीविषयी चर्चा केली. त्यांचा ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक देण्यास सांगून त्यांना ‘सत्संगाची ‘लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवली, तर चालेल का ?’, याविषयी विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अवश्य पाठवा.’’
४ आ. सेवानिवृत्त शिक्षकांनी ‘संस्थेचे ग्रंथ चांगले आहेत’, असे सांगणे आणि त्यांच्या मित्रांचे ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक पाठवणे : मी त्यांना विचारले, ‘‘सध्या आपले काय चालू आहे.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या हातात सनातन संस्थेचा ग्रंथ आहे. मी सकाळपासून आतापर्यंत ग्रंथाचे वाचन करत आहे. माझी साठ पृष्ठे वाचून पूर्ण झाली आहेत. संस्थेचे ग्रंथ चांगले आहेत.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘तुम्ही जी सार्वजनिक वाचनालये आणि मित्र यांना ग्रंथ घेण्यासाठी प्रयत्न केला आहे, त्या सर्वांची नावे अन् त्यांचे ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक मला मिळू शकतील का ?’’ त्या वेळी त्यांनी ही विनंती मान्य करून काही मिनिटांतच त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक माझ्याकडे पाठवले.
वरील सर्व प्रसंगांत ‘आपण केवळ झोळी पसरायला हवी. देव भरभरून देत आहे. हे केवळ भगवंतच घडवू शकतो’, याची देव पावलोपावली जाणीव करून देत होता. ‘ही जाणीव माझ्या हृदयात अखंड जागृत राहू द्या’, अशी गुरूंच्या चरणी कोटीशः प्रार्थना आहे.’
– श्री. अप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर, सोलापूर. (मे २०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |