‘मावळ ऍडव्हेंचर’ संस्थेकडून दिले जाणार गिर्यारोहणाचे विनामूल्य प्रशिक्षण !
पुणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) – मावळ तालुक्यात ‘मावळ ऍडव्हेंचर’ या संस्थेकडून ५ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींना ‘क्लाइंबिंग’ (चढाई करणे) आणि ‘रॅपलिंग’ (उंचावरून उतरणे) याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. बालकांमध्ये साहस आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्यातील भीती जाऊन मनोबल वाढावे, या दृष्टीने या प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे श्री. विश्वनाथ जावलिकर यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत मावळ, उर्सेखिंड येथील तळेगाव चाकण चौक येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाविषयी अधिक माहितीसाठी ९२२६८१६७५५, ९२७२५६०५६८ या भ्रमणभाष क्रमांकांवर संपर्क करावा.
ऐतिहासिक स्थळे, पुरातन शिवकालीन विहिरी आणि दुर्गम घाट यांच्या संवर्धनासाठी त्यांची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने ‘मावळ ऍडव्हेंचर’ ही संस्था वर्ष १९९० पासून या क्षेत्रात कार्यरत आहे. दुर्गम भागातील युवक-युवतींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठीसुद्धा ही संस्था उपक्रम राबवते. या संस्थेत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक युवक सहभागी होतात. या संस्थेच्या कार्यात सर्वश्री विनोद ढोरे, प्रतीक जुन्न्नरकर आणि देवेंद्र जावलिकर यांचे विशेष साहाय्य होत आहे.’’