अवैध मद्य व्यवसायावरून सलग ३ वेळा कारवाई झाल्यास व्यावसायिकाच्या हद्दपारीचा प्रस्ताव !
‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल’च्या अवैध मद्याच्या विरोधातील मोहिमेला यश
सावंतवाडी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकार्यांनी अवैध मद्य वाहतूक केल्याच्या प्रकरणी सलग ३ वेळा कारवाई झालेल्या अवैध मद्य व्यावसायिकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध केले आहेत. या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकार्यांकडून देण्यात आली.
अवैध मद्य व्यवसायाच्या अनुषंगाने ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल’ने आवाज उठवला होता. त्यामुळे आता अवैध मद्य वाहतूक तस्करांना हद्दपारीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गोवा राज्यातून अवैध मार्गाने सिंधुदुर्गात, तसेच महाराष्ट्रात अवैध मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. अशा प्रकारे अवैध मद्य वाहतूक करणारे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कार्यालय असताना अधिकारी हप्ते खाऊन या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. त्यांना जागे करण्याचे काम ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल’ने केले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी कडक धोरण अवलंबून २५ भरारी पथके नेमून अवैध मद्याचा व्यवसाय करणार्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे गोव्यातून येणार्या अवैध मद्याच्या वाहतुकीला काही प्रमाणात आळा बसला आहे. ‘अवैध मद्याची वाहतूक करणार्यांवर हद्दपारीची कारवाई करावी’, अशी मागणी केली होती. त्या मागणीला यश आल्याचे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल’चे संपादक सीताराम गावडे यांनी सांगितले.