अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक
अखिल भारतीय स्तरावरील ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये जोधपूर येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिने संस्कृत भाषेत सादर केलेल्या कथाकथनाला प्रथम क्रमांक
जोधपूर (राजस्थान) – देहली पब्लिक स्कूल आर्.के. पूरम’च्या वतीने १४ ते १६ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय स्तरावरील ‘भाषा पर्व स्पर्धे’त सनातनची ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली जोधपूर (राजस्थान) येथील बालसाधिका कु. वेदिका मोदी (वय १३ वर्षे) हिने प्रथम स्थान प्राप्त केले. ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील ‘सीबीएस्ई’ बोर्डाच्या विद्यालयांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत ५ भाषांमध्ये कथाकथन, सुवचन, गीत गायन आणि चित्रकला विषय देण्यात आले होते. कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत अनुमाने ३०० नवोदित कलाकार सहभागी झाले होते. कु. वेदिका मोदी हिचे संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे, तसेच तिची आजी पू. (सौ.) सुशीला मोदी या सनातनच्या संत आहेत.
कु. वेदिका हिला स्पर्धेच्या वेळी लक्षात आलेली सूत्रे
१. मला स्पर्धेच्या अभ्यासासाठी विद्यालयामध्ये जायचे होते, तेव्हा जीन्स-टॉप हा पोशाख घालण्याची इच्छा झाली नाही आणि मी भारतीय संस्कृतीनुसार सलवार-कुर्ता घालून गेले. मला पाहून माझ्या शिक्षिकेला अतिशय आनंद झाला. त्या म्हणाल्या, ‘‘कित्येक दिवसांनी मी एका मुलीला पाश्चात्त्य संस्कृतीचे कपडे न घालता भारतीय पोशाखात बघत आहे !’’ त्यांच्या शेजारी उभे असलेले आमचे अन्य एक शिक्षक म्हणाले, ‘‘इतक्या दिवसांनी मी एका विद्यार्थ्याच्या तोंडून ‘मम्मी’ किंवा ‘मम्मा’ ऐवजी ‘माँ’ शब्द ऐकत आहे.’’
२. या स्पर्धेच्या निमित्ताने एकदा मला शिक्षकांचा दूरभाष आला. तेव्हा नेहमीप्रमाणे मी त्यांना ‘नमस्कार’ म्हटले. तेव्हा ते हसून म्हणाले, ‘‘तू जेव्हा ‘नमस्कार’ म्हणते, तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटते आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान वाटतो.’’
३. शिक्षकांचे म्हणणे होते की, माझ्या मधुर आवाजामुळे माझी या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
४. स्पर्धेच्या वेळी मला शुभ्र रंगाचा कुर्ता परिधान करायचा होता. मी शाळेत पोचले, तेव्हा आमच्या हिंदी भाषेच्या विभागप्रमुख म्हणाल्या, ‘‘या कुर्त्यामध्ये तू पुष्कळ सात्त्विक भारतीय मुलगी वाटत आहे. तू आपल्या महान भारतीय संस्कृतीचे पालन करत असल्याचे पाहून अतिशय चांगले वाटले.’’
५. आमच्या परिचिताचा एकदा माझ्या आईला दूरभाष आला होता. मी तो घेतला आणि ‘नमस्कार’ म्हटले. ही गोष्ट त्यांनी माझ्या आईला सांगितली. ते आईला म्हणाले, ‘‘आपल्या महान संस्कृतीचे पूर्णपणे पालन करणारी अशी मुले फारच अल्प पहायला मिळतात. मला हे ऐकून फार चांगले वाटले.’’
वरील अनुभवांवरून मला आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात आले आणि अभिमान वाटला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा सर्वांमध्ये भारतीय सभ्यतेचे बीज रुजवून ‘भारतीय संस्कृतीचे पालन करण्यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही’, हे शिकवले. त्यामुळे त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. धर्माचरण केल्याने ते करणार्याला तर त्याचा लाभ होईलच; पण समाजालाही परमानंदाची अनुभूती होईल.