‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाल्यावर सौ. उर्मिला खानविलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. खोकला येत असल्याने सहसाधकांनी कोरोनाच्या संदर्भातील चाचणी करून घेण्यास सांगणे, तिचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यावर ते स्वीकारता येणे आणि ‘जीवनातील फार मोठे प्रारब्ध या माध्यमातून गुरुदेव संपवत आहेत’, असा सकारात्मक विचार होणे
‘मला थोडासा खोकला येत होता. ‘मला अधूनमधून खोकला येतो’, असा विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या वेळी सहसाधकांनी मला कोरोनाच्या संदर्भातील चाचणी करून घेण्यास सांगितले. ‘त्यांच्या माध्यमातून भगवंतानेच मला कोरोनाच्या संदर्भातील चाचणी करायला सांगितले’, असे मला वाटले. त्या वेळी मी देवाला ‘तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशी प्रार्थना न करता ‘अहवाल नकारात्मक (‘निगेटिव्ह’) येऊ दे’, अशी स्वार्थी प्रार्थना केली. प्रत्यक्षात अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आणि ‘तो मला स्थिर राहून स्वीकारताही आला’, ही गुरुमाऊलीची कृपाच आहे. ‘माझ्या जीवनातील फार मोठे प्रारब्ध या माध्यमातून गुरुदेव संपवत आहेत’, असा माझा सकारात्मक विचार झाला.
२. विलगीकरणात असतांनाही गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पहायला मिळाल्याने कृतज्ञता वाटून भावजागृती होणे आणि रुग्णालयात जाण्याची सिद्धता केल्यावर सेवाकेंद्रातच विलगीकरणात रहाण्यास सांगण्यात येणे
‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा सोहळा बघायला मिळावा’, अशी माझी इच्छा होती. ११.५.२०२० या दिवसापासून मी अलगीकरणात होते. १३.५.२०२० या दिवशी दाखवण्यात आलेला गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याची ध्वनी-चित्रचकती मला पहायला मिळाली. त्यानंतर १४.५.२०२० या दिवशी माझा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला. आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयात जाण्याची सिद्धता करून ठेवण्यास सांगितले. जे होईल ते मी स्वीकारत होते. रात्री २.३० वाजेपर्यंत मी कपडे भरून जाण्यास सिद्ध झाले; मात्र त्यानंतर रुग्णालयात जाण्यापेक्षा मला सेवाकेंद्रातच विलगीकरणात रहाण्यास सांगण्यात आले. आधुनिक वैद्यांनी मला औषधे दिली. मला १५.५.२०२० या दिवशीचाही भावसोहळा पहाण्यास मिळाला. याविषयी अतिशय कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला.
३. अकस्मात् घाम येऊन छातीत धडधडू लागणे, पाय अन् मांड्या दुखू लागणे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटणे
भावसोहळा चालू असतांना मला अकस्मात् घाम येऊन छातीत धडधडू लागले. पाय आणि मांड्या दुखू लागल्या. सद्गुरु (कु.) अनुराधाताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांना दूरभाष केल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितलेे. त्यानंतर थोड्या वेळाने बरे वाटले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही लवकर बर्या व्हाल. काळजी करू नका.’’ त्यांच्या या शब्दांनी मला बळ मिळाले.
४. रुग्णाईत असतांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन गुरुदेवांनी तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घेतल्यामुळे कृतज्ञता वाटणे
‘साधनेसाठी एक पाऊल पुढे टाकल्यावर गुरुमाऊली किती प्रेम करते !’, हे सद्गुुरु (कु.) अनुराधाताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांच्या माध्यमातून मला अनुभवायला मिळाले. माझे सर्व कुटुंबीय पूर्णवेळ साधना करत आहे. यजमान, मुलगा आणि सून हे अन्य आश्रमांत आहेत अन् मी दादर येथे आहे. याविषयी यजमान आणि मुलगा मला म्हणाले, ‘‘आपण घरी असतो, तर तुला रुग्णालयात भरती करावे लागले असते. तू सेवाकेंद्रात आहेस; म्हणून देवाने तुझी काळजी घेतली.’’ माझी काही पात्रता नसतांना कोरोनाच्या कालावधीत विलगीकरणात असतांना मला स्वतंत्र खोली आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. रुग्णाईत असतांना सहसाधकांनी माझी सेवा केली. माझ्या गुरुमाऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. ‘पैसा आणि आयुर्विमा असूनही शेवटी संकटकाळात गुरुमाऊलीच माझ्या साहाय्याला धावून आली’, या विचाराने मला अतिशय कृतज्ञता वाटली.
५. त्रास दिवसेंदिवस वाढत जाणे आणि संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटणे
माझा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. एकदा मला रात्री २.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. माझ्या संपूर्ण अंगाची आग होत होती. माझ्या केसांपासून पायांपर्यंत संपूर्ण अंगाला घाम आला होता. पंख्याचा वेग वाढवला की, माझे अंग गार पडायचे आणि वेग मंद केला की, मला अतिशय घाम यायचा. मी गुरुदेवांचा धावा करत होते. मला काहीच सुचत नव्हते. आधुनिक वैद्यांना दूरभाष केल्यावर त्यांनी गोळ्या घेण्यास सांगितले. त्यानंतर मला थोडे बरे वाटले. दुसर्या रात्रीही मला तसाच त्रास होऊ लागला. त्या वेळी रात्री २ वाजता मी सद्गुुरु अनुराधाताईंना दूरभाष केला. त्यांनी सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करायला सांगितले, तसेच महामृत्युंंजय मंत्राचा जप अधिकाधिक करण्यास सांगितला. त्याप्रमाणे देवच माझ्याकडून उपाय करवून घेत होता. उपाय केल्यावर मला बरे वाटले.
६. शरिराची उजवी बाजू दुखायला लागल्यावर बिंदूदाबन करणे आणि ‘बिंदूदाबनाचे उपचार शिकण्याची संधी दिली’, याविषयी गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे
२२.५.२०२० या दिवशी अकस्मात् माझ्या शरिराची उजवी बाजू दुखायला लागली. त्या आधी माझा मुलगा हर्षद याने मला बिंदूदाबन करण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार मी गुरुदेवांना प्रार्थना करून बिंदूदाबन करण्यास प्रारंभ केला. ‘श्रीकृष्णच बिंदूदाबन करत आहे’, असा भाव ठेवून शरिराच्या विविध भागांवर मी बिंदूदाबन केले. तेव्हा ‘भविष्यात वैद्य उपलब्ध झाले नाहीत, तर बिंदूदाबन किती महत्त्वाचे आहे !’, याची मला जाणीव झाली. ‘गुरुदेवांनी साधकांना बिंदूदाबनाचे उपचार शिकण्याची संधी दिली’, याविषयी मला त्यांच्याप्रती फार कृतज्ञता वाटली.
७. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे
७ अ. स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्रासात वाढ झाल्याची संतांनी जाणीव करून देणे : मला एक मास रात्री झोप लागत नव्हती. मला रात्री केवळ २ घंटे झोप लागायची. या वेळी ‘छातीत धडधडणे, घाम येणे, थकवा येणे, छातीत अकस्मात् कळ येणे, चक्कर येणे’, असे त्रास होऊ लागले. ‘हृदयविकाराचा झटका येईल कि काय ?’, असे मला वाटायचे. त्या वेळी माझ्या केसांच्या जटाही झाल्या. माझ्या मनातील ‘स्व’चे विचारही वाढले. हे सर्व मी संतांना सांगितले. तेव्हा संतांनी ‘कोरोनामुळे असा कोणताही त्रास होत नाही. हा त्रास असून स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्रास वाढत आहे’, याची जाणीव करून दिली.
७ आ. संतांनी जाणीव करून दिल्यावर स्वतःच्या मनातील ‘स्व’च्या विचारांची तीव्रता लक्षात येणे : सद्गुरु अनुराधाताईंनी ‘स्व’च्या विचारांमुळे मनात भीतीचे विचार येत असल्याची जाणीव करून दिल्यावर त्याविषयी माझे चिंतन झाले. त्या वेळी ‘स्व’च्या विचारांची तीव्रता माझ्या लक्षात आली. देवाला प्रार्थना करून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी मी प्रयत्न चालू केले. या कालावधीत मी माझा मुलगा, मुलगी आणि यजमान यांच्याशी ‘ते दुखावतील’, अशा पद्धतीने बोलले होते. चिंतन केल्यावर मला याची जाणीव झाली. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गुरुदेवांनी माझ्याकडून करवून घ्यावी’, यासाठी माझ्याकडून त्यांच्या चरणी प्रार्थना झाली.
८. रुग्णाईत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
मी गुरुदेवांना शरण गेले. ‘देवा, माझी काय पात्रता आहे ? सगळे तूच निर्माण केले आहेस. सर्व तुझेच आहे रे देवा ! १ मास एका खोलीत एकटी असतांना भगवंता, तूच माझ्या समवेत होतास. जो त्रास झाला, तो सहन करण्याची क्षमताही तूच दिलीस’, या विचारांनी माझी भावजागृती होत होती. या कालावधीत मी गुरुदेवांचे अस्तित्व सतत अनुभवत होते. तेच माझ्याकडून ८ – ९ घंटे जप करवून घेत होते. माझ्या नातीने मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ नेहमी समवेत ठेवण्यास सांगितले. तसे केल्यावर मला लाभ झाला. ग्रंथ आसंदीवर ठेवून त्याला प्रदक्षिणा घालतांना माझा भावपूर्ण जप होत असे. या ग्रंथाविषयी मला अतिशय कृतज्ञता वाटायची.
९. कृतज्ञता
आधुनिक वैद्यांनी, तसेच सहसाधकांनी वेळोवेळी केलेले साहाय्य यांविषयी मी गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. कृपाळू, दयाळू गुरुमाऊली मला पुष्कळ काही शिकवत होती. जीवनात माझे सर्वस्व असलेल्या गुरुमाऊलीने या आजारपणातून वाचवून मला पुनर्जन्म दिला आहे.
आता मागणे एकची देवा, गुरुचरणांचा विसर न व्हावा ।
श्री गुरुचरणांच्या सेवेसाठी हा देह अखंड झिजत रहावा ॥
‘गुरुमाऊलीनेच माझ्याकडून हे कृतज्ञतापुष्प अर्पण करून घेतले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
वरील लिखाणाचे टंकलेखन करतांना झालेले त्रास : वरील लिखाणाचे टंकलेखन करतांना मला ‘हात-पाय गळणे, प्राणशक्ती न्यून होणे, छातीत धडधडणे, ‘हे लिहू नये’, असे वाटणे’, असे त्रास झाले. केलेले सर्व टंकलेखन पुसले गेल्याने ते परत करायला आरंभ केल्यावर माझ्या छातीत दुखू लागले आणि हात-पाय थरथरायला लागून मला घाम आला.’
– सौ. उर्मिला खानविलकर, दादर, मुंबई. (२४.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |