चालता-फिरता ‘सनातन प्रभात’ होऊया !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर जवळपास ३१५ दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या आवृत्त्यांची पुन्हा छपाई होत आहे. सर्व साधक आणि वाचक दैनिकाची किती आतुरतेने वाट पहात आहेत, हे शब्दांत नाही सांगता येणार ! ‘चातकासारखी वाट पहाणे म्हणजे काय असते ?’, ते साधकांनी दैनिकाच्या संदर्भात अनुभवले असेल’, असे वाटते. या काळात काही वाचकांनीही ‘समाजातील इतर वर्तमानपत्रे चालू झाली, ‘सनातन प्रभात’ कधी चालू होणार ?’, अशी विचारणा केली. दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आल्यावर ‘घरातील एका सदस्याचीच कित्येक दिवसांनी प्रत्यक्ष गाठ पडत आहे’, असे साधकांना वाटत असणार !
भगवंताच्या कृपेने या काळात दैनिकाची ‘पीडीएफ्’ सर्वांपर्यंत पोचवण्यात येत होती. त्यामुळे नाही म्हटले, तरी त्याचा आधार वाटत होता; पण शेवटी दैनिक हातात धरून प्रत्यक्ष वाचण्याची भावना वेगळीच असते ! त्याची सर ‘ऑनलाइन’ माध्यम नाही भरून काढू शकत !
साधकांच्या साधनामार्गातील एक अविभाज्य घटक असलेले दैनिक !
दैनिक ‘सनातन प्रभात’ पुन्हा प्रत्यक्ष चालू होण्याचा दिवस एखाद्या सणापेक्षा अल्प नसणार ! हे दैनिक म्हणजे ‘गुरुदेवांचे संदेशपत्र’, असा साधकांचा, तर ‘हिंदुत्वाच्या कार्यातील मार्गदर्शक’, असा हिंदुत्वनिष्ठांचा भाव असतो. त्याचे कारणच दैनिकाच्या प्रत्येक पानाच्या उद्देशात आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे प्रक्षेपण करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ खरेच एकमेवाद्वितीय आहे. आत्मचैतन्यावरील आवरण दूर करणारे हे दैनिक साधकांच्या साधनामार्गातील एक अविभाज्य घटक आहे.
आता दैनिकाची छपाई पुन्हा चालू होत असली, तरी आगामी काळातील महाभीषण आपत्काळाविषयी संतांनी वर्तवलेले भाकीत पहाता पुन्हा दैनिकाच्या संदर्भात कधी आपत्काळाला सामोरे जावे लागेल, हे सांगता येणार नाही; म्हणून सर्व साधक आणि वाचक यांच्या वतीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे की, दैनिक ‘सनातन प्रभात’ देत असलेले दृष्टीकोन आमच्या अंतर्मनात रूजू देत. आमची साधना वाढून प्रत्येक प्रसंग आणि घटना यांमध्ये योग्य काय करायचे, ते आमच्या लक्षात येऊन आमच्याकडून तशी कृती होऊ दे. आम्हाला चालता-फिरता ‘सनातन प्रभात’ होता येऊ दे !’
– सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.