रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !
कौटुंबिक सोहळ्यात सनातन संस्थेकडून सन्मान !
सावर्डे (तालुका चिपळूण), ३१ जानेवारी (वार्ता.) – ईश्वरी प्रेरणेने स्फुरलेले ज्ञान प्रवचनांद्वारे समाजापर्यंत पोचवणारे, सहज वाणीतून धर्म आणि अध्यात्म यांची शिकवण देणारे, धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली. ३१ जानेवारी या दिवशी येथे झालेल्या एका कौटुंबिक सोहळ्यात त्यांनी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांना पुष्पहार घालून, तसेच श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी उपस्थित सर्वांची भावजागृती झाली. या वेळी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे बंधू आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे साधक श्री. शिवराम बांद्रे अन् वहिनी सौ. वनिता शिवराम बांद्रे, पुतण्या श्री. दीपक शिवराम बांद्रे आणि सून सौ. धनश्री दीपक बांद्रे यांच्यासमवेत सनातनचे काही साधक उपस्थित होते.
पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी वारकरी संप्रदायानुसार साधना केली आहे. त्यांना प्रतिदिन पहाटे ४ वाजता ईश्वरी ज्ञान मिळते. दिवसातून २-३ वेळा असे साधारण ३० मिनिटे त्यांना ज्ञान मिळते. ‘हे ज्ञान भक्तीमार्गियांसाठी मार्गदर्शक असून अत्यंत सुलभ भाषेतील आहे’, हे पू. ह.भ.प. बांद्रे महाराज यांच्या ज्ञानाचे वैशिष्ट्य आहे.